श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ
खो खो मध्ये शिवनेरी सेवा मंडळ व शिर्सेकर्स महात्मा गांधीचे वर्चस्व
मुंबई :- क्रिडा प्रतिनिधी- बाळ तोरसकर
क्रीडा महाकुंभ मधील स्पर्धा आता उत्तरार्धात पोहोचल्या असून मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सहा केंद्रावर झालेल्या संघांमधून विजेत्या संघामध्ये अंतिम महामुकाबले सुरु झाले आहेत. काही वैयक्तीक स्पर्धांचे अंतिम निकाल यापूर्वीच लागले असून काही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहेत. खो-खो स्पर्धेत शहर व उपनगरातील प्रत्येक गटात दोन-दोन संघ अंतिम फेरीत लढले. या स्पर्धेत पुरुषांचे विजेतेपद एम.पी.एल. (मुंबई प्रो लायन्स) ने शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमी तर महिलांमध्ये शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमीने शिवनेरीचा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात पोहचला असून या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.
खो-खो मध्ये पुरुषांच्या अंतिम सामन्यात एम.पी.एल.ने (मुंबई प्रो लायन्स) शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमीवर १२-१० असा ४ मि. राखून २ गुणांनी शानदार विजय साजरा केला. मुंबई प्रो लायन्सच्या सुरज खाके (२.४०, १.४० मि. संरक्षण व २ गुण), ओमकार मिरगळ (२, १.५० मि. संरक्षण व १ गुण), ओम भरणकर (नाबाद २ मि. संरक्षण व १ गुण), हितेश आंग्रे (१.२ मि. संरक्षण व २ गुण) यांच्या अष्टपैलू व धमाकेदार खेळीने शिर्सेकर्स महात्मा गांधीवर मोठा विजय साजरा केला. तर शिर्सेकर्सकडून दीपक माधव (२.३०, १.१० मि. संरक्षण), दिपेश मोरे (२,२ मि. संरक्षण) ऋषिकेश मुर्चावाडे (४ गुण) यांना इतर खेळाडूंकडून योग्य साथ न मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले.
महिलांच्या अंतिम सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमीने शिवनेरीचा सेवा मंडळाचा १०-८ असा एक डाव २ गुणांनी पराभव केला. शिर्सेकर्स महात्माच्या सिद्धी हिंदळेकर (३ मि. संरक्षण व १ गुण), देविका अहिरे (२.४०, नाबाद १.५० मि. संरक्षण व १ गुण), साक्षी वाफेलकर (२.४० मि. संरक्षण व ३ गुण), काजल गायकवाड (नाबाद २.१०, १.२० मि. संरक्षण) यांनी विजयात मोलाची कामगिरी बजावली तर शिवनेरीच्या मुस्कान शेख (२ मि. संरक्षण), प्रतीक्षा महाजन (१.४० मि. संरक्षण व १ गुण) व शिवानी गुप्ता (१.२० मि. संरक्षण व १ गुण) यांची कामगिरी अपुरी ठरल्याने शिवनेरीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
खो-खो मध्ये कुमार (१७ वर्षाखालील) गटात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमीने ओम साईश्वर सेवा मंडळाचा १०-८ असा एक डाव २ गुणांनी पराभव केला. शिर्सेकर्सच्या सुशील चव्हाण (नाबाद १.२०, २.२० मि. संरक्षण व १ गुण), कार्तिक चांदणे (२ मि. संरक्षण व २ गुण) व समर्थ सावंत (२ मि. संरक्षण) यांनी विजयी खेळी केली तर ओम साईश्वरच्या सार्थक माडये (१,२० मि. संरक्षण) व अधिराज गुरव (४ गुण) यांनीच थोडाफार चांगला खेळ केला.
मुलींच्या सामन्यात शिवनेरीचा सेवा मंडळाने शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अकॅडमीवर ८-७ असा चुरशीच्या सामन्यात १ गुणाने विजय साजरा केला. आरुषी गुप्ता (१.३०, ३.४० मि. संरक्षण व १ गुण), मुस्कान शेख (२ मि. संरक्षण व १ गुण), सिद्धी शिंदे (३ मि. संरक्षण), गौरी गुप्ता, शर्वी नडे व जिक्र शेख (प्रत्येकी २-२ गुण) यांच्या जोरदार खेळीने विजय साजरा केला. तर शिर्सेकर्सच्या धानी रोळेकर (३.३० मि. संरक्षण व ३ गुण), दिव्या गायकवाड (२.४० मि. संरक्षण व २ गुण), दिव्या चव्हाण (२ मि. संरक्षण व १ गुण) व लक्ष्मी धनगर (२.१० मि. संरक्षण) यांनी दिलेली निकराची लढत कमी पडली.
किशोर गटात महात्मा गांधी विद्या मंदिरने ओम साईश्वर सेवा मंडळाचा २०-१९ असा चुरशीच्या सामन्यात १ गुणाने विजय मिळवला. महात्माच्या आर्यन चव्हाण (२ मि. संरक्षण), अक्षय राठोड (१.१०, १ मि. संरक्षण व ६ गुण), अनिल राठोड (१.१० मि. संरक्षण व ३ गुण), अमेय मुर्चावडे (४ गुण), आदित्य राठोड (१.३० १.२० मि. संरक्षण व २ गुण) यांची कामगिरी विजयात तर ओम साईश्वरच्या प्रशिक मोरे (१.२०, १ मि. संरक्षण व ४ गुण), अधिराज गुरव (१ मि. संरक्षण व ९ गुण), सुजल गुरव (१.४०, १.२० मि. संरक्षण) यांची कामगिरी पराभवात सुध्दा उठून दिसली.
किशोरींच्या गटात शिवनेरीचा सेवा मंडळाने विद्या प्रबोधिनी इंग्लिश शाळेचा ९-६ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला. शिवनेरीच्या मुस्कान शेख (नाबाद ६.३० मि. संरक्षण व २ गुण), शर्वी नडे (३ मि. संरक्षण व २ गुण), आरुषी गुप्ता (२.४० मि. संरक्षण) यांनी तर सृष्टी जाधव (२ मि. संरक्षण), विभूती धुळप (१.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी सामना गाजवला.
अंतिम विजेत्या सर्व संघांना रोख रु. दहा हजार, क्रीडा कुंभ चषक, सुवर्ण पदक व प्रमाणपत्र व अंतिम पराभूत संघांना रोख रु. आठ हजार, क्रीडा कुंभ चषक, रौप्य पदक व प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकाच्या संघांना रोख रु सहा हजार, क्रीडा कुंभ चषक, कांस्य पदक व प्रमाणपत्र तर चतुर्थ क्रमांकाच्या संघांना रोख रु. पाच हजार, क्रीडा कुंभ चषक, कांस्य पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.