सिन्नर तालुक्यातील ६ ब्रिटिश कालव्यांचे बंद सिमेंट नलिकेत रूपांतर करणेसाठी जलसंधारण विभागाकडून १३ कोटी ५२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
राम सुरसे,सिन्नर/प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील ब्रिटिश कालिन कालव्यांची वहन क्षमता वाढून सुमारे ९४० हेक्टर क्षेत्राला त्याचा लाभ होणार आहे.आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या या कामास जलसंधारण महामंडळाने १३ कोटी ५२ लक्ष रुपयांचा निधीस नुकतीच अंतिम मान्यता दिली आहे.
ब्रिटिश काळात सिन्नर तालुक्यातील नद्यांवर अनेक ठिकाणी लहान-लहान कालव्यांची निर्मिती करण्यात आली होती.यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत होता.मात्र पुढे या कालव्यांची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अनेक कालवे बंद झाले तर काहींची वहन क्षमता घटली. शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे या उद्देशाने आमदार माणिकराव कोकाटे यांनी या कालव्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाकडून निधी आणण्यासाठी जलसंधारण विभागाकडून प्रस्ताव बनवून घेतले.नद्यांवरील ६ कालव्यांचे बंद सिमेंट नलिकेत रूपांतर करण्यासाठी १३ कोटी ५२ लक्ष ६ हजार रुपये इतका निधी जलसंधारण महामंडळाने नुकताच मंजूर केला आहे.
# १९.५ किमी पाईपलाईनद्वारे होणार २० हुन अधिक गावांना फायदा. :-
वडगांव -धोंडवीरनगर या कालव्याची लांबी ६ किमी असून ९०० मिमी व्यासाची पाईपलाईनद्वारे हे पाणी वडगाव,आटकवडे,सोनारी,लोणारवाडी, भाटवाडी,सिन्नर,मनेगाव, पाटोळे, रामनगर, धोंडवीरनगर आदी भागांत पोहचणार असून त्यातून सुमारे २०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे.लोणार नदी ते लोणारवाडी(निफाडी) या कालव्याची लांबी २ किमी असून त्याच्या ९०० मिमी व्यासाच्या पाईपलाईनची वहन क्षमता १३ क्यूसेस इतकी आहे.यातून लोणारवाडी व भाटवाडी येथील १०० हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.सुमारे ३.५ किमी लांबीच्या कुंदेवादी-मुसळगाव या कालव्यासाठीही ९०० मिमी व्यासाची पाईपलाईन टाकण्यात येणार असून तिची वहनक्षमता १५ क्यूसेस इतकी आहे.यातून कुंदेवाडी व मुसळगावच्या १५० हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे.मुसळगाव- दातली या ५ किमी व ९०० मिमी पाईपलाईन कालव्यातून १५ क्यूसेस क्षमतेने पाणी वाहणार असून त्यातून मुसळगाव, दातली व खोपडी येथील ३०० हेक्टर ओलिताखाली येणार आहे.गगन बंधारा ते बोडके वस्ती सोनांबे या १.५ किमी कालव्याच्या पाईपलाईनचा व्यास ६०० मिमी असून त्यातून १२ क्यूसेस क्षमतेने पाणी वाहणार आहे.त्याचा फायदा कोनांबे व सोनांबे येथील ९० हेक्टर क्षेत्राला होणार आहे.म्हाळुंगी नदी ते टेंभुरवाडी या १.५ किमी कालव्याची वहन क्षमता १२ क्यूसेस असून त्यासाठी ६०० मिमी व्यासाची पाईपलाईन वापरली जाणार आहे.त्यातून टेंभुरवाडी येथील १०० हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.बंदिस्त नलिकेचे काम पूर्ण होताच ६ कालव्यांच्या पाण्याने परिसरातील बंधारे पुरपाण्याने भरले जातील.त्यामुळे या भागातील भूजल पातळीही वाढली जाईल.शिवाय या योजनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
# पश्चिमी वाहिनी नद्यांच्या पाण्याचा फायदा होणार. :-
पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी सिन्नर तालुक्यात पडणार असून एकदा नद्यांमध्ये ते पाणी आले की बाराही महिने या कालव्यांद्वारे हे पाणी वाहत राहील त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.हे बंदिस्त कालवे मंजूर झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत आमदार माणिकराव कोकाटे यांचे आभार मानले आहे.
बॉक्स :-
# शेतीला पुरेसा पाणीपुरवठा होणार.
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या या बंदिस्त कालव्यांमुळे शेतीला पुरेसे आवर्तन मिळेल.शिवाय उघड्या कालव्यांमुळे त्यात नागरिक घाण टाकतात.त्यातून दुर्गंधी वाढते.आरोग्याची समस्या निर्माण होते.आता हे कालवे बंदिस्त झाल्यानंतर सर्वच समस्या सुटतील.
:- जयश्री सदाशिव लोणारे, सरपंच
बॉक्स :-
# नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न..
तालुक्यात उत्तम पायाभूत सुविधा उभ्या करण्यास आपण पहिल्यापासूनच प्राधान्य दिले आहे.वीज,रस्ते,पाणी या महत्वाच्या सुविधा उभ्या केल्या तर शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.ब्रिटिशकालीन ६ कालव्यांची फक्त डागडुजी करून उपयोग होणार नाही, ही बाब लक्षात आल्याने पुन्हा नव्याने हे कालवे बंदिस्त पाईपलाईनद्वारे करून त्यांना संजीवनी देणे गरजेचे असल्याचे ओळखून शासनाकडून तशी मंजुरी मिळविण्यात यश आले आहे.अशाच प्रकारे आणखी १५ ते २० योजनांचे सर्व्हेक्षण झाले असून त्याही लवकरच मंजूर होतील.