भ्रूण हत्येच्या आरोपाखाली शासकीय रुग्णालयातील दोन परिचारिकांना अटक
विजयपुर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहरात भ्रूण हत्येच्या आरोपाखाली शासकीय रुग्णालयातील दोन परिचारिकांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील तालुका रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुभद्रा बजंत्री आणि इंडी तालुक्यातील हलसंगी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेले सिद्धम्मा अरकेरी हे अटक करण्यात आलेले आरोपी आहेत.
संबंधित अधिकाऱ्याची परवानगी न घेता गर्भपाताशी संबंधित औषधे व गोळ्या जवळ ठेवून गर्भपातास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच वैद्यकीय पदवी न घेता व सक्षम व्यक्तीची परवानगी न घेता डॉक्टर असल्याचे भासवून जनतेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या शशिधारा कोसंबे यांनी या प्रकरणातील आरोपी असलेल्या सुभद्राच्या घरी भेट दिली असता घराच्या आजूबाजूला, फरशीवर, वापरल्या जाणाऱ्या औषधांची पॅकेजेस, सलाईनच्या बाटल्या इ. आढळून आले होते त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, घटनास्थळी शासकीय यंत्रणेने पुरविलेली औषधे सापडली असून हे अमानवी कृत्य आहे. भ्रूणहत्या रोखण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करत असले तरी अशा घटनांची पुनरावृत्ती चिंताजनक आहे. या प्रकरणात सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, हे आणखीनच खेदजनक आहे. काही दिवसांपूर्वी मला भ्रूण हत्येसंदर्भात काही निनावी फोन आले आणि मी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना यासंदर्भात तपास करून योग्य तो गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या हे प्रकरण उघडकीस आले आणि अधिकाऱ्यांना सावध करून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्रातील सर्व आशा वर्कर्स, डॉक्टर्स, परिचारिका यांची बैठक बोलावून कठोर नियमांची अंमलबजावणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या योग्य ती चौकशी करून दोषींवर गुन्ह्या दाखल करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सतीश तिवारी, डीसीपीओ दिपाक्षी जानकी, सीडीपीओ शिवमूर्ती कुंभार व इतर अधिकारी उपस्थित होते.