महाविद्यालयीन युवक झाला चहापावडर विक्रेता
मार्केटींग स्पर्धेने वाढविले बळ, इतर महाविद्यालयीन मुलांसमोर ठेवला आदर्श
रत्नागिरी/प्रशांत चव्हाण
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे वरिष्ठ
महाविद्यालयाने आयोजित केलेल्या मार्केटींग स्पर्धेत सहभागी झालेल्या
महाविद्यालयीन युवकाने केवळ दोन दिवसात ७४७ चहापावडर पाकिटांची ५६ हजार
८५ रुपयांची विक्री केली. केवळ महाविद्यालयीन स्पर्धेने या तरुणाचे बळ
वाढविल्याने त्याने मुंबईला आलेल्या २५ हजाराच्या नोकरीला नकार देत आता
कायमस्वरुपी घरोघरी फिरुन चहापावडर विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. या
युवकाने इतर महाविद्यालयीन युवाकांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
विद्यार्थीदशेपासूनच मुलांना व्यवसायाची आवड निर्माण व्हावी, त्याने
शहराकडे न वळता आपल्या गावातच रोजगार निर्माण करावा, या उद्देशाने
प्रेरित होऊन या महाविद्यालयाचे प्रा. सुभाष खोत यांच्या संकल्पनेतून
मार्केटींग स्पर्धा आयोजित केली होती. या महाविद्यालयात तृतीय वर्षात
शिकणाऱ्या व जीएसपदी असलेल्या देवराज टाकळकी याने या स्पर्धेच्या
माध्यमातून चहापावडर विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्याने शृंगारतळी
येथील एका होलसेल व्यापाऱ्याकडून ७४७ चहापावडर पँकेट घेऊन केवळ शृंगारतळी
भागात दोन दिवसात त्यांची विक्री केली. त्यातून त्याला २० हजाराचा फायदा
झाला.
केवळ स्पर्धेमुळे मार्केटींगचा व व्यवसायाचा अनुभव आलेल्या देवराजने हा
व्यवसाय करण्याचा पक्का निर्णय घेतला. देवराज हा शृंगारतळी भागातील
जानवळे येथील आहे. या मार्केटींग स्पर्धेच्या धामधुमीत त्याला मुंबईमध्ये
२५ हजार पगाराची नोकरीही आली होती. मात्र, त्याने ही नाकारत चहापावडर
विक्रीच्या व्यवसायाला सुरुवातही केली आहे. सकाळी काँलेज व इतर वेळेत
त्याने घरोघरी फिरुन हा व्यवसाय सुरु केला आहे. हा उपक्रम राबविणारे
प्रा. खोत यांनी भांडवल उभारणीसाठी मदत केल्याचे देवराजने सांगितले व
त्यांचे आभार मानले.
मुलींकडून २४३ साड्यांची विक्री
मार्केटींग स्पर्धेत महाविद्यालयाच्या १० मुलींनी २४३ साड्यांची विक्री
घरोघरी फिरुन केली. त्यांनी ४३ हजाराची विक्री करुन १५ हजारांचा नफा
केला. तसेच काही मुलांनी शृंगारतळी आठवडी बाजारात भाजी स्टाँल, काही
मुलींनी देवखेरकी येथील जत्रेत खाद्यपदार्थांचे स्टाँल, काहींनी सध्या
सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धांच्या ठिकाणी पापडाचे स्टाँल लावले होते तर
एका मुलांने पाटपन्हाळे गावात फिरुन कलिंगड, द्राक्षे यांची विक्री केली.