म्हेत्रे प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
दुधनी प्रतिनिधी / बसवराज बंद्राड
मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशाला दुधनी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. म.नि.प्र.डॉ. शांतलिंग महस्वामीजी यांनी स्वीकारले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव प्रथमेश म्हेत्रे, उपसचिव महादेव खेड , दुधनी प्रतिष्ठित व्यापारी सिद्धाराम येगदी होते. स्व. सौ. लक्ष्मीबाई म्हेत्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक हिरतोट सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमात असलेला उत्स्फूर्त सहभाग आणि विद्यार्थ्यांमध्ये निरंतर होणारे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास बाबत आपले मत मांडले. तसेच प्रशालेतून निरोप घेताना प्रत्येक विद्यार्थ्यांना एक सक्षम विदयार्थी निर्माण करून एक दिशा दाखवण्याचा प्रयत्न शाळेतील सर्व शिक्षकांनी मिळून करत आहेत असे सांगितले. विद्यार्थी मनोगता नंतर शिक्षकांच्या मनोगतामध्ये पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन अभ्यासाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला. पट्टणशेट्टी सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिले . गद्दी सर यांनी विद्यार्थ्याना पाखरासाखी उंच भरारी घ्या पण ज्या घरट्यातून उडायला शिकलात त्याला विसरू नका अशा मार्मिक शब्दात मनोगत व्यक्त केले.तर खेड सरांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या पेपर संदर्भात सूचना देऊन इंग्रजी विषयाच्या पेपर संदर्भात मार्गदर्शन केले . तसेच विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करण्याचा आणि भविष्यात चांगले मित्र बाळगण्याचा सल्ला दिला . प्रथमेश म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि टेन्शन न घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले . दहावीच्या वर्गाचा आढावा घेत असताना हुशार विद्यार्थ्यांचे कौतुक आणि खोडकर विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न यासंदर्भात माहिती दिली. विद्यार्थ्यांना वेळेचा सदुपयोग करून अभ्यासाचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पुढील वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या नवनवीन उपक्रमाचे नियोजन याबाबत माहिती दिली आणि पुढील वर्षाअखेर संस्थेचे एक प्रशस्त आणि सुसज्ज वातानुकूलित इमारत बांधून पुढील निरोप समारंभ तेथेच करू असे ग्वाही देले अध्यक्षीय भाषणात श्री. म.नि.प्र.डॉ. शांतलिंग महस्वामीजी यांनी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना नेहमी आपली दृष्टी एकाक्षासारखी आणि ध्यान बगळ्या सारखे असायला हवे असे सांगितले. सुपाचे उदाहरण देऊन वाईट गोष्टी बाजूला ठेवून आपलं जगणं कसं सुंदर बनवावं याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. करडे सर यांनी केले.