Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

श्री दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प प्रस्तावास मान्यता

Responsive Ad Here

 श्री दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प प्रस्तावास मान्यता


9 कोटी 45 लाख 54 हजाराचा निधी उपलब्ध 


 प्रति हेक्टरी 60 हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग होणार



शिरोळ/ प्रतिनिधी:- संजय सुतार 

     श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सादर केलेल्या, शिरोळ तालुक्यातील सात क्षारपड जमीन सुधारणा संस्थेमार्फत 1545 हेक्टर क्षेत्रावर क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबवण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेडशाळ, अर्जुनवाड, कवठेसार, गणेशवाडी, कुटवाड, हसूर, घालवाड या गावांमध्ये सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर करून क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम राबविण्याकरिता 9 कोटी 45 लाख 54 हजाराचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पांतर्गत प्रति हेक्टरी 60 हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येणार आहेत. मुख्य अभियंता तथा सहसचिव सुनील काळे यांच्या सहीने या प्रस्तावास मंजुरी दिली असल्याची माहिती, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

       गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री दत्त साखर कारखान्याच्या मार्फत 2016 पासून शिरोळ व परिसरातील क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. क्षारपड मुक्ती संदर्भात शेतकऱ्यांच्या बैठका घेणे, जनजागृती करणे, त्यांना एकत्रित करून संस्था स्थापन करणे, तसेच बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे, यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काम करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून आतापर्यंत तालुका व परिसरातील 8500 एकरावर क्षारपड मुक्तीचे काम झाले असून 3500 एकरावर प्रत्यक्षात शेतकरी उत्पादन घेत आहेत. 

       या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत, अनुदान मिळविण्यासाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मृद व जलसंधारण विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये शिरोळ तालुक्यातील एकूण दहा हजार हेक्टर पाणथळ क्षारपड जमिनीपैकी शेडशाळ, गणेशवाडी, अर्जुनवाड, कवठेसार, घालवाड, बुबनाळ, औरवाड, कुटवाड, हसूर या गावांमध्ये सच्छिद्र निचरा प्रणाली द्वारे सुमारे 1910 हेक्टर क्षारपड जमीन सुधारणा करणे बाबत 59 कोटी 45 लाख प्रकल्प किमतीचा प्रस्ताव सादर केला होता. यास राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीने केंद्र शासनाची मंजुरी घेण्याच्या अटीच्या अधीन राहून मंजुरी दिली होती. त्यानुसार दि. 29 जुलै 2021 रोजी केंद्र शासनास सदर प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला होता. केंद्र शासनाने दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये सन 2018-19 मधील राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या उप योजनेअंतर्गत अखर्चित असलेला 2 कोटी 19 लाखाचा निधी (यामध्ये केंद्र हिस्सा एक कोटी 32 लाख आणि राज्य हिस्सा 87 लाख रुपये) प्रकल्पासाठी खर्च करण्यासही मान्यता दिली होती.

         या पार्श्वभूमीवर दत्त कारखान्याच्या 1910 हेक्टर क्षेत्रावरील प्रकल्प राबविण्या बाबत प्रशासकीय मान्यता दिली गेली आहे. या शासन निर्णयानुसार यापूर्वी 365 हेक्टर क्षेत्रासाठी योजना राबविण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित 1545  हेक्टर क्षेत्रासाठी योजना राबविण्यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या 34 व्या बैठकीत 9 कोटी 46 लाख रुपये किमतीची उर्वरित कामे मधून राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये रूपांतरित करून हा निधी वापरण्यात येणार आहे. शेडशाळ येथील 394 हेक्टर, अर्जुनवाड- 366.73 हेक्टर, कवठेसार-130 हेक्टर, गणेशवाडी -234 हेक्टर, कुटवाड - 85.47 हेक्टर, घालवाड -177.80 हेक्टर व औरवाड 157 हेक्टर या गावातील एकूण 1545 हेक्टर क्षेत्रावर सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर करण्यासाठी वरील निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी स्वनिधीतून प्रक्षेत्र विकास, बांध बंधिस्ती, पाण्याचा पाट, जमिनीस आकार देणे, भूसुधारक, हिरवळीची खते, उसाचे बेणे, खते व औषधे आदींचा खर्च करायचा आहे तर सच्छिद्र निचरा प्रणालीसाठी प्रति हेक्टरी 60 हजार रुपये अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळणार आहे.

      क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सात गावांमध्ये स्थापन केलेल्या संस्था व अनुदान रक्कम खालील प्रमाणे आहे:- अन्नदाता बहुउद्देशीय क्षारपड जमीन सुधारणा संस्था शेडशाळ- 2 कोटी 36 लाख 40 हजार. अर्जुनेश्वर बहुउद्देशीय क्षारपड जमीन सुधारणा संस्था अर्जुनवाड - 2 कोटी 20 लाख 38 हजार. कवठेसार बहुउद्देशीय क्षारपड संस्था कवठेसार - 78 लाख, कृषी संजीवनी बहुउद्देशीय क्षारपड जमीन संस्था गणेशवाडी- 1कोटी 40 लाख 40 हजार. श्री नरसिंह बहुउद्देशीय क्षारपड जमीन संस्था कुटवाड हसूर - 51 लाख 28 हजार. श्री घोलेश्वर बहुउद्देशीय क्षारपड जमीन सुधारणा संस्था घालवाड - 1 कोटी 6 लाख 68 हजार. औरवाड बुबनाळ बहुउद्देशीय क्षारपड जमीन सुधारणा संस्था - 94 लाख 20 हजार आणि प्रशासकीय खर्च 18 लाख 54 हजार रुपये धरून 9 कोटी 45 लाख 54 हजाराचा निधी प्रति हेक्टरी 60 हजार प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे.

     गणपतराव पाटील यासंदर्भात बोलताना म्हणाले, श्री दत्त कारखान्याच्या वतीने करण्यात येत असलेल्या क्षारपड मुक्तीच्या 'श्री दत्त पॅटर्न'ची आणि शिरोळ आणि परिसरात सुरू असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची शासनाने दखल घेऊन देशपातळीवरचा नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून  इतका मोठा निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन सुधारण्यासाठी स्वखर्चातून तसेच कर्ज काढून सच्छिद्र निचरा प्रणाली योजना राबवली होती व राबवित आहेत. शासनाकडून या मिळालेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. तसेच शिल्लक असलेल्या क्षारपड जमीन सुधारण्यासाठीही शेतकऱ्यांना नवे बळ मिळून शिरोळ तालुका आणि परिसर क्षारपडमुक्त नक्कीच होईल अशी आशा वाटते. या प्रकल्पासाठी सी. एस. एस. आर. आय. कर्नालचे डॉ. बुंदेला व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत शेती संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे डॉ. श्रीमंत राठोड यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. तसेच या राष्ट्र उभारणीच्या कामात सर्व शासकीय अधिकाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.