२००९ च्या निवडणुकीत गीतेंनी मला पाडले
गुहागरच्या सभेत रामदास कदम यांचा आरोप, तालुक्याच्या प्रत्येक गावाचा विकास करणार
गुहागर/वार्ताहर – प्रशांत चव्हाण
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा
मतदारसंघात शिवसेनेने मला उमेदवारी देऊन बळीचा बकरा केला आणि माजी खासदार
अनंत गीते यांनी मला गुहागरातून पाडले, असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते
(शिंदे गट) रामदास कदम यांनी केला.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे गुहागर तालुका शिंदे गटाचा जाहीर
मेळावा झाला. यावेळी प्रवक्त्या ज्योती वाघमारे, माजी खासदार सुनील
तटकरे, माजी आमदार सदानंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे
बाबाजी जाधव, सुरेश सावंत, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्यासह खेडचे
शिवसेनेचे पदाधिकारी, गुहागर तालुकाध्यक्ष बाबू कनगुटकर, उपतालुकाप्रमुख
प्रभाकर शिर्के, शहरप्रमुख निलेश मोरे, संघटक प्रल्हाद विचारे यांच्यासह
असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गुहागरमध्ये माझा पराभव झाला तो केवळ अनंत गीते यांच्यामुळे. आबलोली
गावात तेथील मतदारांना मला मते देऊ नये असे गीते यांनी सांगितले होते.
यानंतर मी स्वतः खात्री करण्यासाठी त्या मतदारांकडून गीते यांना फोन
करायला सांगितला त्यावेळी गीते यांनी रामदास कदम यांना मते टाकू नका असे
सांगितल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. तसेच
बाळासाहेबांनी डाँ. विनय नातू यांना फोन करुन सेनेच्या कोट्यातून
विधानपरिषद देण्याचे कबूल केले होते. मात्र, नातू यांनी बंडखोरी करुन
अपक्ष निवडणूक लढविली. त्यामुळे येथे माझा पराभव झाला आणि भास्कर जाधव
सारख्याचे येथे फावले, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
पराभवानंतर मी गुहागरकडे १५ वर्षे फिरकलो नाही ही माझी चूक झाली, असे
कबूल करत रामदास कदम यांनी यापुढे गुहागर तालुक्यातील प्रत्येक गावाचा
विकास करण्याचे असल्याचे जाहीर केले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम
महाराष्ट्रातील नेतेमंडळी विकासासाठी एकत्र येतात मात्र, कोकणातले नेते
कधीच एकत्र येत नाहीत, अशी खंत व्यक्त करुन एकमेकांना खेचण्यात, ओढण्यात
व टीका करण्यात तेवढे पुढे असतात असाही आरोप कदम यांनी केला. अनंत गीते
यांनी केवळ समाजाची मते घेऊन खासदारकी जिंकली मात्र, समाजाचा काहीच विकास
केला नाही. त्यांच्या घरी पाणी प्यायला साधे मडके असते आणि त्याला एक
साखळी बांधून ग्लास असतो. ग्लास कोणी घेऊन जाऊ नये अशी ती व्यवस्था
त्यांनी करुन ठेवलेली आहे. हा माणूस साधा चहाही पाजणार नाही, अशीही टीका
त्यांनी केली.
राज्यात सत्तानाट्यात माझा सिंहाचा वाटा असून मुख्यमंत्र्यांकडून पाहिजे
तेवढा निधी मी कोकणच्या व गुहागरच्या विकासासाठी आणणार असल्याचे जाहीर
करुन ज्यांनी या सभेत पक्षप्रवेश केला आहे त्यांच्या गावापासूनच विकासाची
सुरुवात करु, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी गुहागर तालुका काँग्रेसचे
अध्यक्ष रियाज ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे काही पदाधिकारी व अन्य
पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सूत्रसंचालन संतोष
आग्रे यांनी केले.