Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

रक्ताचं केलं पाणी, लाख मोलाचं जिणं...

Responsive Ad Here

 रक्ताचं केलं पाणी, लाख मोलाचं जिणं...


१२५ दिवसांच्या ऊस तोडणीतून धस कुटुंबाने मिळवले ३ लाख ९० हजारांची मजुरी



शिरोळ/प्रतिनिधी:- संजय सुतार 

    राजाभाऊ नारायण धस, सौ. मनिषा राजाभाऊ धस (रा. इकुरका, ता. केज, जि. बीड) या ऊस तोड मजूर पती-पत्नीने अगदी रक्ताचं पाणी केलं आणि लाखमोलाचं जीवन बनवलं. १२५ दिवसांच्या ऊस तोडणीतून त्यांनी ३ लाख ९० हजारांची मजुरी मिळविली. श्रमाला आणि घामाला दाम मिळू शकते, कामावरती निष्ठा हवी आणि शेतीवर प्रेम हवे हे त्यांनी दाखवून दिले. त्यांचा जीवनपट आर्थिकदृष्ट्या संपन्न होणार, असे म्हणणाऱ्यांना आदर्श ठरणारा आहे. 

    या घटनेचा गौरव आणि त्यांच्या कष्टाच्या श्रीमंतीचा सत्कार श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर केला आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



     राजाभाऊ आणि सौ. मनिषा या पती-पत्नीने शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याला ऊस तोडून बैलगाडीतून कारखान्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आणि तसा करार केला.

     राजाभाऊ आणि सौ. मनिषा हे पहाटे ३.४५ वा. झोपून उठायचे. त्यानंतर प्रथम ते बैलांना अंघोळ घालायचे. बैलांना सरकी पेंड, गव्हाटा आट्टा, शेंग पेंड आणि पाणी द्यायचे. यानंतर स्वतःचे आवरायचे. पाच वर्षाचा दत्ता हा त्यांना मुलगा आहे. त्याची अंघोळ, त्याची देखभाल करायची आणि पहाटे ५.१५ च्या दरम्यान बैलगाडीतून दत्ताला सोबत घेऊन दत्त साखर कारखान्याने ज्या शेतकऱ्याचा ऊस तोडण्यासाठी चिठ्ठी दिली आहे त्या रानामाळात ते पोहोचायचे.

     पहाटे ६ पासून ऊस तोडायला हे नवरा-बायको सुरु करायचे. साधारणपणे जवळपास ६ हजार ऊस तोडायचे, ३६० ते ४०० मोळ्या होतील याची दक्षता घ्यायची, तोडलेल्या उसाच्या मोळ्या डोकीवर घेऊन बैलगाडीत भरायचे, भरतानाही कोयत्याने स्वच्छता ठेवायची. बैलगाडी पूर्ण भरून झाल्यानंतर सोन्या आणि गुण्या या बैलांना गाडीला जुंपायचे, रानामाळात गाडी अडकली तर कष्टाचं जिणं. एकाने खांदा द्यायचा, ढकलायचे आणि दुसऱ्याने गाडी हाकायची. गाडी रस्त्याला आली की मुलगा दत्ताला रात्री केलेल्या जेवणाचा घास भरवायचा, त्याला पिण्याचे पाणी द्यायचे आणि त्यानंतर या दाम्पत्याने बाजरीची भाकरी आणि रात्री बनवलेली पातळ भाजी कुस्करून घ्यायची असा दिवसाचा दिनकर करायचा आणि दिवसातून दोन बैलगाड्या म्हणजे जवळपास ९ टन ऊस शिरोळच्या दत्त कारखान्यात पोहोचवायचा. सूर्य मावळला की ७ वा. झोपडीत यायचे, पुन्हा स्वयंपाक करायचा, दुसऱ्या दिवशीची तयारी करायची. यातच रात्री उशिर व्हायचा. उशिरा झोपायचे आणि पहाटे लवकर उठायचे. असे करत राजाभाऊ आणि सौ. मनिषा या नंबर वनच्या जोडीने कष्टाच्या, श्रमाच्या जोरावर रक्ताचे पाणी पाणी करून सत्याचे जीवन जगत १२५ दिवसात ६६१ टन ऊस तोडला. विशेष म्हणजे यंदा उन्हाळा मोठा आहे. पाला अंगाला कापायचा, लाही लाही करायचा. पण,त्यांनी पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष केले, चांगल्या खाण्याकडे दुर्लक्ष केले, झोपेकडे दुर्लक्ष केले आणि ६६१ टन ऊस स्वतः तोडायचा, त्याचा पाला सोलायचा, कंडके करून मोळ्या बांधायच्या, बांधलेली मोळी गाडीत टाकायची, गाडी निटनेटकी भरायची आणि बैलांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष दिले आणि जवळपास रोज ६ हजार ऊस तोडले, ३७५ मोळ्या बांधल्या आणि गाडीने कारखान्यावर पोहोचवल्या.

   १२५ दिवसांच्या ऊस तोडणीतून त्यांनी ३ लाख ९० हजारांची मजुरी मिळविली. श्रमाला आणि घामाला दाम मिळू शकते, कामावरती निष्ठा हवी आणि शेतीवर प्रेम हवे हे त्यांनी दाखवून दिले,

     झोपडीत ना लाईट, ना पंखा, ना मिनरल वॉटरचे पाणी. एकवेळ जेवण बनवायचे आणि तीनवेळा ते खायचे. या परिस्थितीत गरीबीच्या चटक्याला लाखमोलाचा मुलामा त्यांनी दिला.

     दरम्यान, या घटनेचा गौरव आणि त्यांच्या कष्टाच्या श्रीमंतीचा सत्कार श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर केला. धस दाम्पत्यांच्या मुलांचेही गणपतराव पाटील यांनी कोडकौतुक करून शुभेच्छा दिल्या.

     यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक शेखर पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, मयुरभाई, राजेश सानीकोप, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, मुसा डांगे, मुकादम बाजीराव ज्ञानोबा ढाकणे, आनंदा शिंगे, विजय पवार, भाऊसो खंदारे, शक्तीजीत गुरव,  यादव साहेब, विलास माने आदी उपस्थित होते. या श्रमाचा सत्कार झाल्यानंतर सौ. मनिषा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.