देशी वाण बीज बँकेची चळवळ वाढविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू- गणपतराव पाटील
स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील महिला देशी वाण बीज बँकेस नोंदणी प्रमाणपत्र
शिरोळ /प्रतिनिधी: संजय सुतार
शेडशाळ येथील दीडशे महिलांनी गेल्या पाच वर्षापासून एकत्रित येऊन देशी वाण बीज बँकेची संकल्पना पूर्णत्वास आणली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे देशी वाण उपलब्ध करून या बँकेच्या माध्यमातून सकस आहार व निरोगी जीवनशैली रहावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. सहकार खात्याने या महिलांच्या प्रयोगशील कामाला चालना देत नोंदणी प्रमाणपत्र देऊन नवी ऊर्जा दिली आहे. बीज बँकेची चळवळ वाढविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली. आगामी काळात गुलकंद बनवण्यासाठी देशी गुलाबाची लागवड करून नवा प्रयोग यशस्वी करावा असे आवाहनही त्यांनी केले.
स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील महिला देशी वाणांचे संरक्षण व संवर्धन सहकारी बीज बँक मर्या. शेडशाळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर या संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाले. शिरोळचे सहाय्यक निबंधक अनिल नादरे यांच्या हस्ते नोंदणीचे प्रमाणपत्र संस्था संचालक व प्रवर्तकांना देण्यात आले. यावेळी गणपतराव पाटील हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सहकार अधिकारी विनायक खोत व व्ही.व्ही. वाघमारे हे उपस्थित होते.
अनिल नादरे म्हणाले, शिरोळ तालुक्यातील महिलांनी एकत्र येऊन देशी बीज बँक स्थापन करतात, हे काम कौतुकास्पद आहे. संघटितरित्या महिलांनी केलेला हा यशस्वी प्रयोग देश पातळीवर जाण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल. या अनोख्या उपक्रमशील देशी वाण बीज बँकेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावा असेही ते म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, बाळासाहेब माळी, डॉ. दगडू माने, शमशादबी पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र प्रधान यांनी आभार मानले.
यावेळी व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक शेखर पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना, माती परीक्षक ए. एस. पाटील, ज्योतीकुमार पाटील, अशोक शिरढोणे, रावसाहेब चौगुले, वरूण पाटील, संजय सुतार, शैला चौगुले, जयश्री शिरढोणे, भारती केरीपाळे, रूपाली मेंगे, अक्काताई मगदूम, शर्मिला केरीपाळे, स्मिता महाडिक, अमृता कोष्टी, सुरेखा मानकापूरे, शोभा नाईक शेडबाळे यांच्यासह अन्य महिला व मान्यवर उपस्थित होते.