Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुर्लक्षित चिवेली बंदर पर्यटनाच्या दिशेने

Responsive Ad Here

 दुर्लक्षित चिवेली बंदर पर्यटनाच्या दिशेने




रत्नागिरी/प्रशांत चव्हाण


पूर्वीच्या काळी प्रवासी जलवाहतुकीच्यादृष्टीने सोयीस्कर ठरलेले चिपळूण

तालुक्यातील चिवेली बंदर आता पुन्हा एकदा गजबजले आहे ते एका पर्यटन सफरीमुळे. येथील सचिन पडवळ या मच्छिमार तरुणाने संपूर्ण वाशिष्ठी दर्शन पर्यटकांना घडावे यासाठी बोटीद्वारे जलप्रवास सेवा सुरु केली आहे.

त्यामुळे कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या चिवेली बंदराची पावले आता

पर्यटनाच्या दिशेकडे झुकू लागली आहेत. त्यामुळे भविष्यात चिवेली बंदर

पर्यटनाच्या नकाशावर येण्यास काहीच हरकत नाही.


कोकणच्या सौंदर्यात समुद्राप्रमाणेच खाड्यांचाही मोठा वाटा आहे. कांदळवन,

मत्स्यशेती यांना पूरक पोषक ठरलेले वातावरण, लहान-मोठी जलवाहतूक सेवा त्यामुळे खाड्यांनाही तितकेच महत्व आहे. मात्र, या खाड्यांचा पाहिजे त्या

प्रमाणात पर्यटनात्मक विकास झालेला नाही. केवळ वाळू उत्खननामुळे शाप ठरलेल्या या खाड्या आजही दुर्लक्षित आहेत. पर्यटनाच्यादृष्टीने व एक

रोजगाराचा भाग बनण्यास या खाड्या समर्थ आहेत मात्र, राजकीय उदासिनताही

याला कारणीभूत आहे.


राजकीय व शासनस्तरावरुन उदासिनता असली तरी अलिकडे पर्यटन वाढीसाठी

खाडीपट्ट्यातील तरुणांकडून असे प्रयत्न होताना दिसत आहेत. गोवळकोट, करंबवणे अशा खाडीपट्ट्यात वाशिष्ठी सफर सेवा सुरु आहेच या जोडीला आता दुर्लक्षित चिवेली बंदरातून आता पर्यटक, प्रवाशांना वाशिष्ठी दर्शन घडावे यासाठी सचिन पडवळ या तरुणाने ही जल पर्यटन सेवा सुरु केली आहे.

जलप्रवासादरम्यान, कांदळवन जंगल, बँक वाँटर राईड, फिश फार्म, गरम

पाण्याचे कुंड, बर्ड पाँईंट, क्रॉकोडाइल पाँईट आदी ठिकाणे पर्यटकांना

अनुभवायला, पहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर बर्थडे पार्टी, वेडिंग पार्टी, प्री वेडिंग शूट, होम स्टे, कोकणी जेवण अशा सुविधाही येथे उपलब्ध

करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना चिवेली बंदरातून सफरीचा आनंद

लुटता येणार आहे.


या नव्या सोयीमुळे चिवेली बंदर व तेथून होणाऱ्या जलवाहतुकीच्या जुन्या

आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.


 सुमारे ६०-७० वर्षापूर्वी

कोकणातील खाड्यांमधून होणाऱ्या जलवाहतुकीच्या काळातील दाभोळ- गोवळकोट

खाडी किनाऱ्यावरील एक निसर्गरम्य, सुंदर व देखणे बंदर म्हणजे चिवेली

बंदर. एकेकाळचे प्रवासी व माल वाहतुकीने गजबजलेले हे बंदर आजही तितकेच

महत्वाचे आहे. त्यापूर्वी कोकणात वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणजे जलवाहतुक

छोट्या बोटी, लाँचेस, पडाव व लहान होड्यांमधूनच होत असे. चिपळूण तालुक्याच्या ठिकाणाहून गोवळकोट बंदरामार्गे अनेक गावांमधील खाडी किनाऱ्यावरुनच सर्व प्रकारची वाहतूक होत असे. प्रामुख्याने त्या काळात

मुंबईला ये-जा करण्यासाठी या खाडीमधूनच कधी ८ ते १० तास तर कधी १५ ते १६

तास लागत असतं. कारण या खाड्यांमधील वाहतुक बहुतांशी समुद्राच्या

भरती-ओहटीवर अवलंबून असे.


इ.स. १९६०-६१ लावी याच खाडीमधून चालणारी छोटी बोट, लाँच व दाभोळ ते मुंबई (भाऊचा धक्का) अशी मोठी प्रवासी बोट यामधूनच असे. त्या काळी बाँम्बे स्टीम नेव्हीगेशन कंपनी ही प्रवासी वाहतूक करणारी कंपनी होती. त्यावेळी

भाऊचा धक्का येथून सुटणारी मोठी प्रवासी बोट समुद्रामार्गे दाभोळपर्यंत

येत असे. एका बाजूने धक्क्याला लागलेल्या या बोटीला दुसऱ्या बाजूने

गोवळकोटकडे जाणारी मीरा नावाची बोट खेटून उभी राहत असे. दाभोळ-गोवळकोट

प्रवास करणारे प्रवासी याच मीरा नावाच्या बोटीमध्ये बसत असतं. गोवळकोटकडे

जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड व अवजड सामान म्हणजे प्रत्येकाकडे किमान ३ ते

४ गोणी व काही पेट्या भरलेले विविध जीवनावश्यक वस्तूंचे सामान असे. त्यात

अगदी कांदे, बटाटे, खोबरे, सुकी मासळी, खजूर, चहा, साखर, साबण, कपडे,

चादरी अशा विविध वस्तूंच्या या गोणी असत.


दाभोळला मोठ्या बोटीतून गोवळकोटला जाणाऱ्या बोटीत सर्व प्रवासी चढले की

मग ही बोट या मार्गावरील दाभोळ, भोपण, कारुळ पांगारी, चिवेली, पन्हाळजे,

सुतवी, करंबवणे, मालदोली, गोवळकोट अशी बंदरे घेत गोवळकोटला जात असे.  या बोटीने दररोज येणाऱ्या प्रवाशांना घेण्यासाठी त्यांची ओझी उचलण्यासाठी

त्यांचे नातेवाईक व मजुरांची गर्दी होत असे. बोटीच्या शिट्टीचा मोठा आवाज

अगदी १०-१२ कि.मी. पर्यंतच्या वस्तीवर स्पष्टपणे ऐकू येत असे. त्याकाळी

चिवेलीबरोबरच बोरगाव, बामणोली, गोंधळे, वाघिवरे, कौंढर, रामपूर, उमरोली,

मार्गताम्हाने, देवघर, गिमवी, मुंढर अशा लांबच्या अंतरावरील

प्रवासीसुध्दा त्याकाळच्या एकमेव वाहतुक साधन असलेल्या बैलगाडीने चिवेलीत ये-जा करीत.


 चिवेली बंदर हे एक नैसर्गिक, सुरक्षित, शांत व सुंदर असे बंदर आहे.

संध्याकाळच्या संधीप्रकाशात न्हाऊन निघताना चिवेली बंदराकडे पाहिले की आनंद गगनात मावेनासा होतो. सूर्यास्ताच्या वेळी आपल्या घरट्याकडे

झेपावणारी पांढऱ्या शुभ्र रंगाच्या पक्षांची माळ पाहताना भान हरपून जाते.

बंदरावरुन विशाल असा खाडीकिनारा न्याहाळला की, दापोली तालुक्याच्या

खाडीपट्ट्यातील अनेक गावांचे दर्शन होते.


चिवेली बंदराचा आज खऱ्या अर्थाने विकास व्हायला पाहिजे होता.

चिपळूण-गुहागर मार्गावरील जवळचे बंदर म्हणून याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

मध्यंतरी चिवेली बंदर ते पन्हाळजे असा खाडीपूल होणार होता मात्र, तोही

रद्द झाला. येथे खाडीपूल झाल्यास चिपळूण-गुहागर मार्गावरील सुमारे ४०

गावांतील नागरिक, प्रवासी यांना खेड, दापोली व तेथून मुंबईत जाणे सुलभ

होईल. पक्के रस्ते तयार करुन दळणवळण वाढेल. गावांचाही विकास होईल मात्र, या सर्वांसाठी राजकीय इच्छाशक्ती हवी आहे. येथील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी, नागरिक यांनी एकजुटीने शासनदरबारी हा विषय मांडल्यास चिवेली बंदर एक जिल्ह्यातील नामवंत बंदर होऊ शकेल व त्याचे महत्वही वाढेल.


:-   चिवेलीचे आहे असे सौंदर्य


चिवेली बंदर हे चिपळूण-गुहागर मार्गावरील घोणसरे येथून सुमारे १९ कि.मी. आहे. रस्ता चांगला असल्याने काही मिनिटातच आपण चिवेली बंदरात पोहचू शकतो. रस्त्याच्या एका बाजूला भरगच्च वृक्षवेली, झाडी यांची दरी तर दुसऱ्या बाजूला हिरवाईने काळ्या पाषाणाच डोंगर हे चिवेलीचे विलोभनीय सौंदर्य. याच

नागमोडी रस्त्यावरुन विशाल चिवेली बंदराचे दर्शन होते. शिवाय ग्रामदेवता वाघेश्वरी मंदिर दृष्टीस पडते. या सौंदर्याबरोबरच आता हौशी प्रवासी, बाहेरील पर्यटक यांना चिवेली बंदरातून वाशिष्ठी दर्शन सफर अनुभवता येणार आहे. अधिक माहितीसाठी सचिन पडवळ – ९४२१५९३०९५, ९६५७००४४६४ येथे संपर्क

साधून अवश्य भेट द्यावी.