आरजीपीपीएल करणार १६७ स्थानिक कामगारांची कपात
ऐन निवडणुकीत मुद्दा तापणार, नोटीस मिळालेल्या कामगारांची मनसेकडे धाव
गुहागर/प्रशांत चव्हाण –आरजीपीपीएलमधील (रत्नागिरी गँस) दाभोळ ब्रेक
वाँटर प्रकल्पातील एकूण १६७ कामगारांची कपात करणार आहे. १५ मे नंतर ही
कपात करण्यात येणार असून तशी नोटीस एक महिन्यापूर्वीच कामगारांना देण्यात
आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा तापणार असून महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेने या कामागारांच्या बाजूने ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला
आहे.
गुहागर तालुक्याच्या औद्योगिकीकरणात महत्वाची भूमिका बजावणारा आरजीपीपीएल
प्रकल्प हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाचा विषय बनला आहे.
अगोदरच गँसच्या तुटवड्यामुळे कमी झालेली वीजनिर्मिती, वीजेचा महागडा दर
अशामध्ये भरडला गेलेल्या या प्रकल्पाने यापूर्वीच मोठ्या प्रमाणात
कर्मचारी कपात केलेली आहे. यामध्ये सर्वाधिक स्थानिक कामगारच होते. या
प्रकल्पाने आपल्या कार्यक्षेत्रातील अंजनवेल, वेलदूर, रानवी या तीन
ग्रामपंचायतींचा कोटीचा कर थकविला आहे. तसेच यावर्षीच्या ऐन
पाणीटंचाईच्या काळात अंजनवेल गावाला ग्रा.पं. ने मागणी करुनही टँकरने
पाणीपुरवठाही केलेला नाही.
अशा असंख्य कारणांनी आरजीपीपीएलवर येथील स्थानिकांची नाराजी असताना
यामध्ये आता कामगार कपातीचा घेतलेला निर्णय स्थानिकांना उद्धवस्त करणारा
ठरला आहे. आरजीपीपीएलच्या दाभोळ ब्रेक वाँटर प्रकल्पातील सर्व
आरएसडब्ल्यू कामगार जे एमज.एस. अँपेक्स इन्फ्रा मध्ये कार्यरत आहेत.
त्यांना दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, या प्रकल्पाची कामे पूर्णत्वास
आली आहेत हे लक्षात घेऊन नमूद कामगारांना कमी करण्यात येत असल्याची नोटीस
देण्यात येत आहे, असे नमूद केले आहे. त्यामुळे १६७ कामगारांनी मनसेच्या
पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
प्रतिक्रिया – आरजीपीपीएलमधील कामगार कपातीच्या मुद्द्यावर अनेकवेळा
गुहागर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंपनीला जाब विचारला आहे. यापूर्वी
कामगार कपात करुन कंपनी स्थानिकांवर अन्याय करत आहे. यावेळीही आम्ही या
कामगारांबरोबर असून त्यांना न्याय मिळवून देणार आहोत.
विनोद जानवळकर, उप जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रत्नागिरी
उमेदवारांच्या प्रचारात आरजीपीपीएल दुर्लक्षित
सध्या लोकसभा निवडणुकांचे रण पेटले आहे. रायगड मतदारसंघात गुहागर
तालुक्याचा समावेश आहे. येथे महायुतीच्या व महाविकास आघाडीच्या दोनही
उमेदवारांच्या प्रचार सभा जोरात सुरु आहेत. तीच तीच आश्वासने, पर्यटन
विकासाचे गाजर दाखविले जात आहे. उद्योग उभारण्याचे आश्वासन दिले जात आहे.
असे असंख्य मुद्द्यांना स्पर्श करताना उमेदवार सोयीस्कररित्या तालुक्यात
औद्योगिकीकरणाची पायाभरणी करणाऱ्या आरजीपीपीएलकडे दुर्लक्ष करत आहे. या
प्रकल्पाविरोधात कोणतीही भूमिका किंवा एखादे आश्वासन कोणत्याही पक्षाचा
उमेदवार, एखादा नेता देत नसल्याचे दिसून येत आहे