अडूरच्या सुनेची तिसऱ्यांदा नर्मदा परिक्रमा!
साडेचार महिन्यांपूर्वी सुरू केला होता प्रवास, महादेवावर जल अर्पण करून परिक्रमेची संकल्पपूर्ती
रत्नागिरी प्रतिनिधी : - प्रशांत चव्हाण
नर्मदा मैय्याचा आशीर्वाद आणि स्वामी समर्थांचे पाठबळ या जोरावर गुहागर तालुक्यातील अडूर गावची सून असलेल्या सौ. रश्मी महेश विचारे यांची नर्मदा परिक्रमा पुन्हा एकदा पूर्ण झाली. परिक्रमा पूर्तीची ही तिची तिसरी वेळ. १ नोव्हेंबरला नर्मदा मैय्याला स्मरून महेश्वरपासून तिच्या या प्रवासाला सुरुवात झाली होती. ७ मार्चला ती पुन्हा महेश्वरला पोहोचली. महेश्वरला नर्मदा मैय्याच्या किनाऱ्यावर बसून पलिकडचा किनारा पाहिला तेव्हा डोळे पाण्याने डबडबले. त्या किनाऱ्यावरून जवळपास साडेचार महिन्यांपूर्वी सुरू केलेला प्रवास मैय्याने पूर्ण करून घेतला याचे अपार समाधान होते. दुसऱ्या दिवशी महादेवावर जल अर्पण करून परिक्रमेची संकल्पपूर्ती झाली.
विशेष म्हणजे हा दिवस महाशिवरात्रीचा आणि जागतिक महिला दिनाचा. एक अनोखा योग.
यंदा पुन्हा एकदा नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प तिने सोडला. दोनवेळा परिक्रमा केली असली तरी नवी धाकधूक असतेच. इतके दिवस कुटुंबापासून दूर राहायचे, सगळ्या सुखसुविधा काही महिने त्यागायच्या म्हणजे मनात काहूर माजते. पण मैय्याचे एकदा बोलावणे आले की तिच्याकडे सगळे सोपवून जायचे याच भावनेने १ नोव्हेंबरला तिने परिक्रमा उचलली. नर्मदा मैय्याची ओढच तशी असते. जणू आपल्या माहेरी जाणाऱ्या मुलीची उत्कट भावनाच.
यावेळी परिक्रमेचा मार्ग थोडा वेगळा होता. नेहमीप्रमाणेच कठीण होता. कष्टप्रद होता. नेहमीच्या परिक्रमेच्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने जाण्याचे ठरविले होते. वेगळी तीर्थक्षेत्रे, नवी ठिकाणे पाहात, त्यांची अनुभूती घेत मार्गक्रमण करायचे होते. मैय्या आणि स्वामी सोबत असल्याचा विश्वास होता पण परीक्षाही पाहिली जाणार होतीच. ती चुकत नाही. त्या परिक्षेला सामोरे जात जवळपास ३८०० किमी अंतर त्यांच्याकडून पूर्ण करून घेतले गेले. तसे हे नेहमीच धक्कादायक असते. हे कसे काय होत असेल असा प्रश्न मनात असतोच. पण हे तिच्यासाठीही तेवढेच धक्कादायक असते. कारण आपण हे एवढे अंतर, हा अवघड प्रवास करू शकू याबाबत मनात शंका असते. पण मैय्याची सोबत असल्याचा विश्वासही असतो.
रोज जवळपास ३० ते ४० किमी प्रवास करत आश्रम किंवा एखाद्या मंदिरापर्यंत पोहोचायचे हा नित्यक्रम. गेल्या दोन परिक्रमांमुळे काहीशी सवय झाली असली तरी नवी आव्हाने असतातच. नवे मार्ग, नवे डोंगर, नवे चढउतार, नवी जंगले, नवी ठिकाणे, नवा किनारा आपल्या क्षमता आजमावून पाहतात. आपला निर्धार मोडण्याचा प्रयत्न करतात, आपण गळून पडतो. नकोसे होते. पण मैय्या सोबत आहे ही जाणीव असते. ती नवा उत्साह देते.
आध्यात्मिक आनंदाच्या पलिकडे जाऊन तो प्रदेश, परिसर आपल्याला वेगळा अनुभव देतो. नवी माणसे भेटतात. ती आपुलकीने चौकशी करतात. कधी सकाळी चहापानाचे विचारतात, कधी जेवणासाठी आग्रह धरतात. कधी रात्री घरी विश्रांतीची विनंती करतात. घरातील मुलेसुद्धा मैय्याला काय हवे नको ते पाहतात. प्रत्येक परिक्रमावासियांना येणारा हा अनुभव असतो.
भ्रमणातून आपल्याला जवळची माणसे सापडतात. ती आपलीशी होऊन जातात. अगदी जवळचाही कुणी व्यक्ती करणार नाही इतकी सेवा ते करतात. परिक्रमा पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना रश्मी विचारे यांची एका घरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांनी ती येणार म्हणून नवा गालिचा अंथरला, नवी चादर, उशांची कव्हर्सही बदलली. जेवणासाठी वेगळे पदार्थ बनवले. गरम गरम चहा दिला. आंघोळीसाठी गरम पाणी करून दिले. घरातलेही एवढी सेवा कुणी करणार नाही, तेवढी ती परकी माणसे करतात. त्यांना परके का म्हणायचे मग? सगळ्यांचे ध्येय एकच असते ते म्हणजे नर्मदा मैय्याचा आशीर्वाद, तिची कृपा आपल्याही कुटुंबावर राहावी यासाठी निर्मळ मनाने ही माणसे परिक्रमावासियांसाठी खूप काही करत असतात. आपल्या भोवतालच्या माणसांपेक्षा कितीतरी वेगळी माणसे अवतीभवती आहेत, वेगळे जग आहे. परिक्रमेतून हे नवे जग गवसते. या तीन परिक्रमांमध्ये मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातला थोडा भाग हे आता रश्मी यांना माहीत झालेत. हा महत्वाचा अनुभव आहे. अनेक माणसे जोडली गेलीत. ती आज हक्काची माणसे झालीत.
या प्रवासात वेगळे, चमत्कारिक अनुभव येत राहतात. त्यामागील कारणे कळत नाहीत. परिक्रमेदरम्यान एकेठिकाणी एक कुत्रा तिच्यासोबत चालू लागला. कधी मागे कधी सोबत असे चालत त्याने तब्बल ४० एक किलोमीटर अंतर कापले. तो का सोबत आला, माहीत नाही. आपण हे सांगू शकत नाही. परिक्रमेतून वेळ काढून रश्मी घरी फोन करत असते. त्यातून तिच्या प्रवासाविषयी कळत राहते. कौतुक वाटते आणि मनात थोडीशी भीतीही असते. पण तिच्या आत्मविश्वासाचे, जिद्दीचे आश्चर्यही वाटते. नर्मदा परिक्रमा करणे हे कठीण आहेच पण तुम्ही स्वतःला नर्मदा मैय्याच्या चरणी पूर्णपणे वाहून घेतले असेल तर त्या प्रवासादरम्यान येणाऱ्या आव्हानांना तुम्ही सामोरे जाऊ शकता किंबहुना तुम्ही त्या आव्हानांवर मात करू शकता. तिच्याबद्दल ही खात्री असते त्यामुळे निर्धास्तही होता येते.
रश्मी विचारे यांची ही परिक्रमा पूर्ण झाली याचा प्रचंड आनंद आहे, समाधान आहे. नर्मदा मैय्याचा, स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे त्यामुळेच हे शक्य झाले हे नक्की. तिच्या डोक्यावर त्यांचा वरदहस्त आहे, असे वाटत राहते. शिवाय एका स्त्रीमध्ये किती क्षमता असते, हेदेखील तिच्याकडे पाहून पटते. ती नर्मदा मैय्याबद्दल बोलत राहते तेव्हा तिचे आणि आई-लेकीचे नाते आहे असे वाटत राहते. तिच्याशिवाय हे आव्हान पार करणे तसे सोपे नाही. ज्यांनी परिक्रमा पूर्ण केल्या त्यांनाही असाच आशीर्वाद लाभत असला पाहिजे. ते बळच तुम्हाला प्रवासात पुढे नेत असते, तुमच्यापुढील अडथळे, संकटे याच आशीर्वादामुळे दूर होतात. पण एक अत्यंत वेगळा जीवनानुभव देणारी ही परिक्रमा आहे, हे खरे!