पंचगंगेला सुशोभित करण्यापेक्षा प्रदूषणमुक्त करण्याची गरज: जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग राणा
राजकारणात चांगले लोक आल्यास देशाची प्रगती: भास्कर पेरे पाटील
शिरोळ/ प्रतिनिधी:- संजय सुतार
जगामध्ये पाण्यासाठीचे युद्ध सुरू झाले आहे. पण पाण्यामुळे जगात शांती येते, लढाई होत नाही हे लक्षात घेऊन विश्वशांती जल दिन आयोजित करण्यात आला. पण जागतिक पातळीवर पाण्यापासून शांतीसाठी कोणतेच प्रयत्न केले गेले नाहीत ही खूप खेदाची गोष्ट आहे. आपल्या नद्या, विहिरी पुन्हा जीवित झाल्या आणि प्रदूषण मुक्त झाल्या तर मानवाच्या जीवनात शांती आणि समृद्धी येईल. यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. आगामी काळात चंबळ खोऱ्यातील 21 नद्यांना पुनर्जीवित करण्याचा संकल्प केला असून स्व. सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कारातून मिळालेले एक लाख रुपये या कामासाठी वापरणार असल्याची माहिती जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग राणा यांनी दिली. पंचगंगेला सुशोभित करण्यापेक्षा ती प्रदूषणमुक्त कसे होईल याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही राणा यांनी यावेळी सांगितले.
डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा व आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांची प्रकट मुलाखत व युवा संवाद मेळावा श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर होणे आवश्यक असून राजकारणात चांगले लोक आल्यास देशाची निश्चितच प्रगती होईल, असा आशावाद भास्कर पेरे पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ व समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी प्रकट मुलाखत घेतली.
राणा पुढे म्हणाले, मांगू मीना यांच्यामुळे मी पाण्याचे काम सुरू केले. राजकारणामध्ये श्रेयवादासाठी पाण्याच्या प्रश्नावर कोणीच काम करीत नाही. कमी पैशात जमिनीच्या पोटात पाणी कसे येईल? निसर्गाचा समतोल कसा राखला जाईल? आणि आपण जर जमिनीवर इलाज केला तरच जमीन आपल्यावरती निश्चित चांगला इलाज करेल ही भावना घेऊन आम्ही काम करीत राहिलो. उज्ज्वल भविष्यासाठी पाणी महत्त्वाचे असून सर्वांच्या विचाराने पुढे जाणे आवश्यक आहे. महात्मा गांधी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण आणि महापुरुषांच्या विचाराने प्रभावित होऊन मी काम करीत गेलो. अन्यायाचा प्रतिकार आणि सत्यासाठी उभे राहण्याची भूमिका घेणे म्हणजेच अध्यात्म आहे ही जयप्रकाश यांचे विचार मला नेहमी मार्गदर्शन करतात. पाणी प्रश्नाच्या आंदोलनामध्ये अनेक गुन्हे दाखल झाले, त्याच पद्धतीने जागतिक पातळीवर सन्मानही झाले. पण पाण्याशिवाय जग दुःखाच्या खाईत जात असून आपण याला प्रयत्नाची पराकाष्टा करून पुन्हा एकदा अनुशासित करण्याची गरज आहे. अजूनही पाण्यासाठी खूप मोठी लढावी लागणार असून यामध्ये सर्वांचेच सहकार्य अपेक्षित आहे असेही त्यांनी सांगितले. राणा यांनी आपल्या बालपणापासून आतापर्यंतची वाटचाल, संपूर्ण क्रांती आंदोलन, पाण्यासाठीचे अनेक ठिकाणी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना आलेले यश, सन्मान, सुखाचे आणि दुःखाचे गीत आधी विषयावर भरभरून बोलत संवाद साधला.
भास्कर पेरे पाटील म्हणाले, लहानपणापासून मी खोडकर असलो तरी कुटुंब हे वारकरी संप्रदायातले असल्याने किर्तन, प्रवचन आणि महापुरुषांच्या विचारांचा मार्ग यामुळे माझ्यावरती चांगला परिणाम होत गेला. आज संतांचे, महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे. गावचा विकास करताना काय केल्याने लोक ऐकतील? किंवा काय करावे लागेल? ही भूमिका घेऊन कार्यरत राहिल्याने विकास होत गेला. लोकांचे आणि खास करून गावातील महिलांचे विशेष सहकार्य मिळत गेले, त्यामुळे योजना यशस्वी होत गेल्या. राजकारणामध्ये चांगल्या प्रतिमेचे लोक चालत नाहीत हे जरी खरे असले तरी चांगल्या लोकांनी राजकारणात येणे आवश्यक आहे. आपण म्हणतो की वाईट लोक देश लुटत आहेत पण ही परिस्थिती चांगले लोक राजकारणात नसल्यामुळे होत आहे. चांगले लोक जर राजकारणात आले नाहीत तर देशाला कोणीही वाचवू शकत नाही. यासाठी युवा वर्गानेही आपल्या प्रश्नावर रडत न बसता त्यातून मार्ग काढत समाजकारण आणि राजकारण केले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर आपण भांडले पाहिजे. यासाठी एक निश्चित योजना, सिस्टीम कार्य करणे आवश्यक आहे. गावातील महिलांच्या विचाराने थोडे काम करत गेल्यास तर कोणीही आत्महत्या करणार नाही, कर्जबाजारी होणार नाही. यासाठी महिलांचा आदर ठेवायलाच पाहिजे. त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्यांना शिकवा. माणसाने माणसाशी कसे वागले पाहिजे इतके जरी भान ठेवले तरी प्रगती होत जाईल. आगामी काळात सुद्धा विकासाची भूमिका घेऊनच मतदान केल्यास, विकासाला चालना दिल्यास देश महासत्ता होण्यामध्ये अडचण येणार नाही असे सांगून भास्कर पेरे पाटील यांनी गावांमध्ये राबवलेल्या अनेक योजनांची, उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
राजेंद्रसिंग राणा आणि भास्कर पेरे पाटील यांनी वेदिका भुजुगडे, समृद्धी गायकवाड, अथर्व पाटील, अवंतिका देवतारे, मानसी सासणे, जयश्री पाटील, डॉ. दगडू माने यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली. प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कु. मानसी गौराज हिने केले. प्रतीक्षा पाटील यांनी आभार मानले. यावेळी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, कारखाना संचालक इंद्रजीत पाटील, शेखर पाटील, मयूरभाई, महेंद्र बागे, मुसा डांगे, चंद्रशेखर कलगी, सर्व संचालक, उदगाव टेक्निकल हायस्कूल, जांभळी हायस्कूल, पॉलिटेक्निक कॉलेज, आयटीआय कॉलेज येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व शिक्षक, परिसरातील सरपंच, सदस्य, कारखानाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.