देव तारी त्याला कोण मारी
अखेर कूपनलिकेत अडकलेल्या त्या बालकास वाचविण्यास यश
विजयपूर प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लच्याण गावातील शेतातील कुपनलिकेत पडलेल्या सात्विक या २ वर्षीय बालकाची अखेर सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे
तब्बल 20 तास चाललेल्या बचाव कार्यानंतर बाळाची सुटका करण्यात आली.मुलाचे पालक सतीश मुजगौंड व पूजा आणि स्थानिकांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सात्विकला जिवंत बाहेर काढण्यात अखेर बचाव दलाला यश आले. वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सात्विकला तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.एनडीआरएफच्या पथकाने बचाव कार्य केले. त्याला बेळगाव येथील श्रीशैल चौगला यांच्या नेतृत्वाखालील राज्य आपत्ती व्यवस्थापन दल (एसडीआरएफ), स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत केली. बचाव कार्य अंतिम टप्प्यात आल्याने रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. बालकाला कुपनलिकेतून बाहेर काढताच त्याला प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.बचाव कार्याचा अंतिम टप्प्यात कर्मचाऱ्यांना मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला होता. त्यामुळे बचाव पथकाचा उत्साह वाढला आणि त्यांनी आपल्या कामाचा वेग वाढविला अखेर सात्विकला बोअरवेल मधून सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
बुधवारी सायंकाळी सहा वाजता शंकरप्पा मुजगौंड यांच्या शेतातील कुपनलिकेत बालक पडल्याची माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी टि भुबालन, जिल्हा पोलिस प्रमुख ऋषिकेश सोनावणे व इतर अधिकारी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते.