मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराज कावड निशाण प्रस्थान तयारी पुर्ण
राम सुरसे/ सिन्नर प्रतिनिधी
सालाबदप्रमाणे चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रा महोत्वाचे दोन टप्पे अगदी शांततेत पार पडले असून सर्व नाथभक्तांनी या सोहळ्यात आनंदाने भाग घेऊन वादळ-वारे परिस्थितीत सुध्दा सढळ हाताने देणगी दान केले.
यात्रेच्या तिस-या टप्यातील उत्सवासाठी गंगाजल घेऊन येणेसाठी हजारो कावडीधारकांच्या व नाथभक्तांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.०५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ०२ वाजता नाथांचे निशाण श्री क्षेत्र मढी येथून वाजत गाजत प्रस्थान होणार आहे सदर कावडीतील मानाच्या निशाणांची शनिवार दि.०६ एप्रील २०२४ रोजी श्री क्षेत्र पैठण येथे भव्य मिरवणूक होणार आहे. निशाण मिरवणूकीनंतर कावडीकर श्री क्षेत्र मढीला परतीचा पायी प्रवास करत दि.०६ एप्रील २०२४ रोजी शेवगाव येथे मुक्कामी थांबतील त्यानंतर सदरच्या कावडी दि.०७ एप्रील २०२४ रोजी निवंडूगा शिवेवर (फुलबागेत) मुक्कामी येणार आहेत. सालाबादप्रमाणे या कालावधीत मढी व निवडूंगे शिवेवर भव्य अशी फुलबाग यात्रा भारणार आहे. येथे लाखोंच्या संख्येने घागरी व डब्याने गंगाजल घेऊन येणा-या कावडींचा पंचड सोहळा पहाण्यासारखा असतो.
विसाव्यासाठी थांबलेल्या कावडीकरांकडून नाथांच्या समाधीला जलाभिषेक करविण्याकरिता दि.०८ एप्रील २०२४ रोजी दुपारी श्री कानिफनाथ गडावरून नाथांची पालखी, पंचधातूचा घोडा, अब्दागीरी व भव्य निशान घेऊन विश्वस्त व ग्रामस्थ भाविकांसमवेत वाजत गाजत त्यांच्या स्वागतासाठी जाणार असून दोन्ही निशानांची भेट लक्ष्मी मातेच्या मंदिराजवळ दि.०८ एप्रील २०२४ रोजी दुपारी दोनच्या सुमारास होणार आहे त्यावेळी मानाच्या पाच (पैठण, मढी, माळी बाभूळगाव, सुसरा व तागडखेल / उंदखेल) इत्यादी कावडीच्या निशानांची भेट होणार आहे. कावडी घेऊन ज्यावेळी कावडीकर गडावर येतात त्यावेळी लहान मुले कावडीकरांची वाट पवित्र व्हावी म्हणून नवसपूर्तीपोटी लोटांगन घेतात व नाथांचे कवणे गातात. मढी येथील कावडीकरांकडून पारंपारीक कवणे गावून वाजतगाजत नाथांच्या संजीवनी समाधीला महास्नान घातले जाणार आहे.
प्रती वर्षी गुढी पाडव्याला होत असलेली गर्दी लक्षात घेवून कार्यरत विश्वस्त मंडळाने दि. ०५ ते ०७ एप्रील २०२४ रोजी मुक्तद्वार दर्शन सुविधा ठेवली आहे दि. ०८ एप्रिल २०२४ रोजी निशाणभेटीनंतर कावड जलाभिषेक सोहळा सुरू होणार असून तो गुढीपाडव्याच्या रात्री ०२.०० पर्यंत चालणार आहे. त्यानंतर सफाई व महापूजा तयारीसाठी समाधी दर्शन बंद करण्यात येणार असून गुढीपाडव्याच्या पहाटे नाघांच्या संजीवन समाधीची महापूजा व अभिषेक होणार आहे. त्यांनतर पंरपरेप्रमाणे संजीवन समाधीला चंदन उटी, गोरोचन, गर्भागिरी परिसरातील पुजनिय वनस्पती, पंचामृत, दवना यांचे संपूर्ण मिश्रण करून लेप चढविला जातो. नाथ समाधीला लेप चढविण्याचा वर्षातील हा एकमेव पवित्र दिवस असतो. समाधीला चंदनाचा लेप (मळी) लावून महाआरती झाल्यानंतर गुढीपाडव्यापासून पादुका दर्शन सुरू होणार आहे.
देवस्थान समीतीतर्फे भाविकांना नम्र अवाहन करण्यात येते की, दि.०७ व ०८ एप्रिल २०२४ रोजी निवडूंगे-मढी या रस्त्याने एकेरी वहातूक असणार असून तो रस्ता फक्त कावडीकरांसाठी श्री क्षेत्र मढीला येण्याचा मार्ग असेल.
बॉक्स :-
यावर्षीची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून भाविकांनी पाण्याचा वापर जपून करावा तसेच देवस्थान समीतीने निर्धारीत केलेल्या ठिकाणीच गाड्या पार्क कराव्यात जेणेकरून ट्रॅफीक जाम होणार नाही त्यासाठी प्रशासनाला तसेच देवस्थान समितीला सहकार्य करावे, प्रवाशी वाहतूक करणा-या वाहन धारकांनी गाड्या ओव्हरस्पीड चालवू नयेत, ओव्हरटेक करणे टाळावे, भाविकांनी भोंदूगिरीपासून व खिसेकापू आणि मोबाईल चोरापासून सावध रहावे तसेच ट्रस्टच्या नावाखाली अनाधिकृतपणे पैसे वसूल करणा-या इसमांच्या दबावाला बळी न पडता यात्रा महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सामिल होवून नाथदर्शनाचा लाभ घ्यावा तसेच यात्रेला गालबोट लागू नये म्हणून निवडणूक आयोगाच्या आचार संहितेचे काटेकोरपने पालन करावे. असे नम्र आवाहन देवस्थान समितीने केले आहे.