कोकणी उद्योजकांची जागतिक भरारी कौतुकास्पद
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून कोकणातील उद्योजकांचा गौरव, रत्नागिरी उद्योजक फेडरेशन कार्यक्रमात मार्गदर्शन
मार्गताम्हाने/ प्रतिनिधी- प्रशांत चव्हाण
मराठी माणसाला, त्यातही कोकणी माणसाला उद्योग करता येत नाही, असे म्हटले जाते. मात्र आज ज्या ५ जणांचा येथे पुरस्कार देऊन सन्मान होत आहे, त्या कोकणी उद्योजकांची जागतिक भरारी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी काढले.
रत्नागिरी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्टीज या उद्योजकांनी स्थापन केलेल्या जिल्हा फेडरेशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण रविवारी शहरातील बहादूरशेखनाका येथील सहकार भवनात पार पडले. यावेळी ते बोलत होते. गौरव सोहळ्याप्रसंगी उद्योजक दीपक गद्रे यांचा जीवनगौरव, सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्काराने वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रा. लिमिटेडचे प्रशांत यादव, सीएसआर पुरस्काराने लोटेतील घरडा केमिकल्स लिमिटेड, जागतिक उद्योजक पुरस्कार स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लि. चे उद्योजक नीलेश चव्हाण, जिल्हा उद्योजकता पुरस्काराने डिलाइट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे अनिल देवळे यांना गौरवण्यात आले. यावेळी माजी आमदार विनय नातू, रमेश कदम, चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, डॉ. प्रशांत पटवर्धन, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत, उपाध्यक्ष धनंजय यादव, सेक्रेटरी केशव भट, रघुवीर सावंत देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मीनल ओक यांनी केले.
प्रभू म्हणाले की, जगाला काय हवे, याचा शोध घेऊन उद्योग सुरू केल्यास तो कायम टिकतो. या ५ जणांनी जगाची गरज ओळखून उद्योग सुरू केल्याने ते जागतिक पातळीवरचे उद्योजक होऊ शकले. कोकणी माणूस मनात आणले तर काय करू शकतो, याचे उत्तम उदाहरण आणि आदर्श हे ५ जण आहेत. त्यामुळे असे किर्तीवान उद्योजक घडले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या देशात बऱ्याच बाबी उलट घडत आहेत. आज १४ टक्के शेतकरी उत्पन्न घेतो आणि ६५ टक्के म्हणजेच ८० कोटी लोकांना तो धान्य पुरवतो. त्यामुळे ही परिस्थिती बदलली पाहिजे, म्हणजे उलटी झाली पाहिजे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवले पाहिजे. शेतकरी टिकला तरच सर्वांचे भले आहे. याचा विचार झाला पाहिजे, असे सांगतानाच अनेक सामाजिक प्रश्नांना आपण मागे सारले आहे. त्यामुळे त्यांचा डोंगर झाला असून ते सोडवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी
व्यक्त केले. उद्योजकांचा गौरव करताना प्रभू म्हणाले, कोकणातीलच मराठी तरुणांना रोजगार मिळवून देणारा पहिला उद्योजक म्हणजे निलेश चव्हाण. त्यांच्यासारखे उद्योजक कोकणात तयार झाले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. उद्योजक प्रशांत यादव यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देऊन सहकार रुजवला. भविष्यात शेतकऱ्याला मोठे करण्यासाठी सहकारी संस्था आवश्यक असून सर्वांनी यावर चिंतन करणे आवश्यक आहे. देशात केवळ चार टक्केच पाणी असून भविष्यात देशालाच नव्हे तर जगाला पाणीटंचाई भासणार आहे. तसेच सर्व क्षेत्रातील नोकऱ्या जाण्याची भीती प्रभू यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले की, कोकण रेल्वे मार्गावर सर्वच फलटांवर शेड केली पाहिजे. सर्व फ्लॅटवर शेड नसल्याने प्रवाशांना ऊन पावसात उभे राहावे लागते असे त्यांनी सुचविले. उद्योजकांचा गौरव करताना त्याबरोबरच पाणी प्रदूषण, पर्यावरण यांचाही विचार केला पाहिजे असे स्पष्ट मत भावे यांनी व्यक्त केले.
उद्योजक निलेश चव्हाण म्हणाले, आजपर्यंत मी देश विदेशात अनेक पुरस्कार मिळवले मात्र माझ्या जन्मभूमीत आज हा मला जो सन्मान मिळाला आहे त्याचा मी ऋणी राहील अशी भावना व्यक्त केली. माझ्या उद्योग व्यवसायात कोकणातील तरुण मुले कामाला आहेत याचा मला सार्थ अभिमान असून ते भविष्यात नक्कीच कोट्यधीश होतील व चांगले नाव कमावतील अशी अपेक्षा व्यक्त केली.