Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

संत गंगागिरीजी महाराज महाकुंभ नारळी सप्ताहास सुरवात

Responsive Ad Here

 संत गंगागिरीजी महाराज महाकुंभ नारळी सप्ताहास सुरवात


सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे 

वारकरी महाकुंभ नारळी सप्ताहाचे भव्य आयोजन. 


गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून नोंद झालेला सप्ताह. 


उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते सप्ताह स्थळी भव्य कृषी प्रदर्शनाचे उदघाटन




राम सुरसे/प्रतिनिधी वावी ता. सिन्नर


॥ लेने को हरिनाम ॥ ॥ देणे को अन्नदान ॥

॥तरने को हरीनाम ॥॥डुबने को अभिमान ॥


(दि.१०)श्री.संत गंगागिरीजी महाराज सरला बेटाच्या वतीने १७७ वा अखंड हरिनाम सप्ताह यंदा तालुक्यातील पंचाळे येथे होत आहे. शनिवारी (दि.१०) या सप्ताहाची सुरुवात होणार असून, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत, त्यांच्या हस्ते या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.


सप्ताहासाठी दररोज अंदाजे पाच लाख भाविक भजन आणि भोजनाचा आस्वाद घेतील. एकादशी आणि सप्ताहाच्या समारोपाला ही संख्या दुप्पट ते तिप्पट असते. त्यावरून राज्यभरातील जवळपास ५० लाख भाविक उपस्थिती लावणार असल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे. नाशिक, संभाजीनगर, अहमदनगर जिल्ह्यांतील १० हजार टाळकरी भाविकांनी या सप्ताहासाठी नोंदणी केली असून, ते यामध्ये सातही दिवस सहभागी होणार आहेत, सप्ताहासाठी पार्किंगसह ३०० एकर जमीन उपलब्ध करण्यात आली आहे.


गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून या सप्ताहाची नोंद झालेली असून, प्रामुख्याने सहा महिने अगोदरपासून पूर्वतयारी सुरू आहे. शनिवारी सकाळी १० वाजता शोभायात्रेने सप्ताहाची सुरुवात होणार असून, यानिमित्त गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सप्ताह कालावधीत दररोज दुपारी १ ते २ या वेळेत रामगिरी महाराज यांचे श्रीमद् भगवद् ‌गीतेवर प्रवचन होणार आहे. सात दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंक्तीमध्ये टँकरने आमटी व ट्रॅक्टरने महाप्रसाद वाटप होते. 


अनेक शेतकऱ्यांनी गोदावरी कालव्यातून शेतीसाठी केलेल्या पाइपलाइन सप्ताहासाठी खुल्या करून दिल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांना फाटा देऊन जमीन खुली ठेवली आहे. 

आमदार माणिकराव कोकाटे व खासदार राजाभाऊ वाजे यांचे खास योगदान लाभले असून, खा. वाजे यांनी ध्वजारोहण कार्यक्रमात २० हजार भाविकांचा अन्नदान खर्च केला. मंडपासाठी, स्वागत कमानी यासाठी आमदार कोकाटे व माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी योगदान दिले आहे. सप्ताहकाळात आमदार माणिकराव कोकाटे हे येथे तळ ठोकून उपस्थित रहाणार आहे व सप्ताहात कुठलीही कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली जाणार असलेची हमी त्यांनी दिलेली आहे. 




डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचे २५० जणांचे पथक तैनात आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सप्ताहस्थळी सिन्नर नगर परिषद, संजीवनी साखर कारखाना, कोळपेवाडी साखर कारखाना यांचे अग्निशमन बंब, पाच रुग्णवाहिका, सिन्नर, कोपरगाव, संगमनेर व संभाजीनगर येथील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे २५० जणांचे पथक तैनात ठेवले जाणार आहे. सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयासह तीन रुग्णालये, ब्लड बँकांनाही आगाऊ माहिती देऊन २४ तास सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहे. 

:- संभाजी जाधव, अध्यक्ष सप्ताह कमिटी नियोजन समिती 



१६ ऑगस्ट रोजी एकादशीच्या दिवशी दुपारी २ वाजता रामगिरी महाराज यांचे कीर्तन होणार असून, त्या निमित्त ५०० पोते साबुदाणे, २५० पोते शेंगदाणे, ३०० क्विटल बटाटे असा साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद भाविकांना दिला जाणार आहे. सप्ताहाची सांगता शनिवारी (दि. १७) द्वादशीच्या दिवशी होणार असून, त्यानिमित्त सकाळी १० वाजता रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या दिवशी लाखो भाविकांना ५०० पोते साखरेची बुंदी, ७०० पोते मुरमुरे चिवड्याचा महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. हा प्रसाद चक ३०० ट्रॅक्टरने काही मिनिटांत भाविकांना वाटप केला जाणार आहे.



हेलिकॉप्टरने येणार गंगागिरी महाराज पादुका :-


गंगागिरी महाराजांच्या चरणपादुकांसह सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांचे शनिवारी (दि. १०) सकाळी ९ वाजता पंचाळेत हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे.तदनंतर हत्ती वरती पादुका मिरवणूक होणार असुन मिरवणुकीत उंट,घोडे, लेझिम पथक,देवी देवतांची वेशभुषा परीधान केलेले भावीक भक्तांसह लाखो भावीक उपस्थित असणार आहे. 


सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांसाठी भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवारांच्या हस्ते शनिवार दि. १० रोजी कृषी प्रदर्शन उद्घाटन केले जाणार असुन कृषी प्रदर्शनात १०० ते १५० स्टॉल थाटण्यात येणार आहेत हि शेतकरी वर्गासाठी एक पर्वणीच असणार आहे. 


* महाप्रसाद बनविण्यासाठी सुरवात :-

सप्ताहाचे अंतिम दिवसाचे महाप्रसाद बनविणेचे काम सुरू झाले असुन १००×२०० फुटाचे भव्य स्वयंपाकगृह बनविण्यात आले आहे. २७००० विटांपासुन स्वयंपाकासाठी डिझेल भट्ट्या बनविलेल्या आहे.भट्ट्यांसाठी प्रतिदीन ४००० लि. डिझेल वापरात येणार असुन ८० क्विंटल साखरेसह ४० क्विंटल बेसनपिठापासुन  सलग सात दिवस बुंदी २६० कारागीरांकरवी बनविली जात आहे. महाप्रसाद बनविणेसाठी १०० कढई,१२५ मोठे पातेले सह बुंदी सुकविण्यासाठी स्वयंचलीत यंत्र वापरले जात आहे.अश्या स्वरूपाचे ३६ सप्ताह महाप्रसाद बनविणेसाठी अल्प मोबदल्यात कचरू एकनाथ शिंदे हे काम करत होते तेच काम आम्ही पुढे करत आहोत.

:- गणेश कचरू शिंदे,संचालक एस.के.केटर्स      उंदिरवाडी येवला


शर्मा मंडप वैजापुर

सप्ताहसाठी मुख्य भजन मंडप २००×३०० , महाराज राहुटी १००×५०, स्वयंपाकगृह १००×२००,भोजन मंडप १००×२००,भजन व किर्तन स्टेज ३०×९०फुट आकाराचे उभारण्यात आलेले आहे.यासह स्वागतकक्ष, १० स्टॉल उभारण्यात आले आहे. १५० स्पीकर, ५०० लाईट हॕलोजन, ०५ जनरेटर वापरले जाणार आहे.