१४ वर्षीय द्रिश्या नाईकची राष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
मुंबई /क्रिडा प्रतिनिधी - बाळ तोरसकर
मुंबई : येत्या १६ ते २४ सप्टेंबर दरम्यान कर्नाल, हरियाणा येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील ज्युनियर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी भांडूपच्या अवघ्या १४ वर्षीय नववीत शिकत असलेल्या द्रिश्या श्रीकांत नाईक हीची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत द्रिश्याने चमकदार कामगिरी करताना ६ गुणांची कमाई करुन आपले हरियाणाचे तिकिट पक्के केले. या स्पर्धेत तिने ६ विजय मिळविले. तर दोन सामने गमावले. तिचा चौथा क्रमांक लागला. स्पर्धेत प्रथम ६ क्रमांक मिळवणारे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. शेवटच्या फेरीत द्रिश्याने यजमान कोल्हापूरच्या प्रथम मानांकन देण्यात आलेल्या दिव्या पाटीलचा पराभव करुन स्पर्धेत खळबळ माजवली. तसेच तिने पुण्याच्या फिडे रेटेड खेळाडू राजराजेश्वरी देशमुखला देखील नमविण्याचा पराक्रम केला होता.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेली द्रिश्या मुंबईची एकमेव खेळाडू आहे. ३ वर्षे स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळणाऱ्या द्रिश्याचे केतन पाटील प्रशिक्षक आहेत. ती रोज ४ तास नियमित सराव करते. तिचे वडिल आंतर कॉलेज बुद्धिबळ स्पर्धेत खेळले होते.