Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

जुवाड बेटावरील अन्नपूर्णाचा प्रवास ठरला 'लक्ष'वेधी !

Responsive Ad Here

 शेतीतून अर्थसमृद्धी ते महिला सक्षमीकरण...

जुवाड बेटावरील अन्नपूर्णाचा प्रवास ठरला 'लक्ष'वेधी !


 कन्साई नेरोलॅक पेंटस लि. चे सामाजिक उत्तरदायित्व


 मुंबईस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांची  जुवाड भेट

बेटावरील अन्नपूर्णा प्रकल्प यशाने अधिकारी सुखावले

उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर


चिपळूण  दि. २७ (प्रतिनिधी)





आपत्तीच्या बेटाचा प्रवास आता समृद्धीच्या बेटाकडे सुरू  असल्याचे चित्र हे  सर्वोच्च आनंदाचे आहे.  मानवी जीवन एका वेगळ्या उंचीवर नेण्याच्या या प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत याचा आनंद आणि अभिमान वाटतो अशी भावना कंसाई नेरोलॅक पेंट्स लि. या कंपनीतर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शेतीतून अर्थसमृद्धी ते महिला सक्षमीकरण हा प्रवास 'लक्ष'वेधी ठरल्याचे सांगण्यात आले.

निमित्त होतं, दुसऱ्या वर्षाचा रब्बी हंगाम प्रारंभ होण्यापूर्वी कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वातून सुरू असलेल्या अन्नपूर्णा प्रकल्पाच्या पाहणीचे. यानिमित्ताने  चिपळूण तालुक्यातील मिरजोळी ग्रामपंचायत क्षेत्रातील जुवाड बेट येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कंन्साई नेरोलॅक कंपनीचे सामाजिक उत्तरदायित्व व उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर यांच्या माध्यमातून या बेटावर अन्नपूर्णा प्रकल्पाचे निर्माणकार्य करण्यात आले आहे. पर्यावरण पूरक शेती, शेतीतून समृद्धीकडे आणि शेतीतून महिला सक्षमीकरण.. या गोष्टीतून हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.     


     दीड वर्षांपूर्वी या ठिकाणी अशा प्रकल्पाच्या नियोजना संदर्भाने बैठक घेण्यात आली. वशिष्ठी नदीच्या प्रवाहाने चारही बाजूने घेरलेले हे सुंदर असे जुवाड बेट!

 निसर्गाच्या सातत्यपूर्ण आपत्तीने आणि विशेषत: दरवर्षीच्या पुरामुळे ते त्रस्त झाले. २००५ आणि २०२१ च्या महापुराच्या तडाख्याने आता दरवर्षी या बेटावरील रहिवाशांना पावसाळ्यामध्ये कुटुंब कबिल्यासह स्थलांतर करावे लागते. त्यामुळे हे आपत्तीचे बेट ठरू लागले.

अपार कष्ट, दुर्दम्य ध्येयनिष्ठा आणि प्रामाणिक वृत्तीने काम करण्याची तयारी या बेटावरील शेतकऱ्यांची आहे.  त्यांच्या याच जिद्दीला आणि परिस्थितीवर मात करण्याच्या वृत्तीला..  स्नेहार्द सहकार्याचे पाठबळ घेण्याचा निर्णय घेण्यात आला.  आपत्तीच्या या  बेटाला समृद्धीचे बेट बनविण्याचा निर्धार कंसाई नेरोलॅक पेंट्स लि. कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या साथीने केला.  त्याला पहिल्याच वर्षी चांगले यश मिळाल्याचे दिसून आले. 

 *या पार्श्वभूमीवर कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या साऱ्या कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे या बेटावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिखलयुक्त व काट्याकुट्याच्या पाय‌वाटेवरुन तीन किलोमीटरची पायपीट कंन्साई नेरोलॅक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या या बेटावर पक्ष्यांच्या मंजूळ आवाजात पदक्रमण सुरू असतानाच त्यांना एका महाकाय मगरीचे देखील दर्शन घडले.या वाडीतील शेती गटांशी या निमित्ताने संवाद साधण्यात आला. 

अन्नपूर्णा गट सदस्य महिलांनी कंपनीने हा प्रकल्प सुरू केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आमच्या जीवनात या प्रकल्पाने सकारात्मक बदल घडवून आणल्याचे सांगितले.

 पहिल्याच वर्षी उत्पादन व उत्पन्नात झालेली वाढ ही गेल्या रब्बी हंगामात  तुलनेने दुप्पटीहून अधिक असल्याचे महिला शेतकरी अनिता माळी, विद्या माळी, जयश्री माळी, सुगंधा माळी यांनी आपल्या भाषणातून नमूद केले.

    कन्साई नेरोलॅक कंपनीचे मुख्य मनुष्यबळ विकास व्यवस्थापक संतोष देशमुख यांनी सावित्रीबाई आणि सावता माळी शेतकरी बचत गटाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ग्रामीण समृद्धीमध्ये शेतीच्या भूमिकेवर भर देऊन शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची त्यांची विकसित झालेली दृष्टी आणि समृद्धीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

    प्रकल्पाला मिळालेलं यश हे कौतुकास्पद असून जागतिक अन्न सुरक्षेसाठी अशा प्रकल्पांचे महत्त्व कंपनीचे उत्पादन सरव्यवस्थापक राजेश पटेल यांनी अधोरेखित केले. देशमुख यांनी लोकांचे जीवनमान पालटून टाकणारा अन्नपूर्ण प्रकल्प कंपनीच्या सामाजिक उत्तरदायत्वातून उभारला आणि जे ध्येय ठेवले त्याप्रमाणे आपत्तीचे बेट समृद्धीचे होत असल्याबद्दल कंपनीचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक- अध्यक्ष  सुधीर राणे यांनी गौरवोद्गार काढले. 

कंपनीच्या उत्पादन विभागाचे अध्यक्ष अभिजीत नातू यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतीमधील केलेले काम चित्तवेधी असल्याचे सांगत या प्रकल्पाला यापुढे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच लोटे येथील  कंपनी प्लांटचे वर्क्स व्यवस्थापक जयवर्धन व मनुष्यबळ विकास व्यवस्थापक नंदन सुर्वे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. महिला सक्षमीकरणाच्या या प्रकल्पाला वाढतील पुरुष मंडळींचे मिळालेले नित्यनियमित सहकार्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात सामाजिक कार्यकर्ते अनिल माळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.गावचा इतिहास, सामाजिक, आर्थिक व विकास विषयक माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेश जोष्टे यांनी दिली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्था सचिव सीमा यादव यांनी येथील प्रकल्पाची गरज, शेतकऱ्यांनी संघटितपणे केलेले काम, सकारात्मक प्रतिसाद आणि एकूणच इथल्या वाडीवरचे बदललेले चित्र अशा साऱ्याचा ऊहापोह केला. पहिल्याच वर्षी उत्पादन व उत्पन्नामध्ये झालेली लक्षणीय वाढ, नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात कपात आणि दुसरीकडे मिळालेले अधिकचे उत्पन्न त्यामुळे समृद्धीकडे सुरू झालेली वाटचाल त्यांनी विशद केली. संस्थेच्या खजिनदार शर्वरी साडविलकर- कुडाळकर यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात शेतकरी व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात सुसंवाद झाल्याचे सांगत कंपनी व अधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

कन्साई नेरोलॅक पेंट्स लि .या कंपनीकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय खत निर्मिती प्रशिक्षण व निरंतर प्रक्रियेसाठी साहित्य, रब्बी हंगामातील बी- बियाणे, वेलवर्गीय हजारो रोपे, गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण व शेती मार्गदर्शन, पाईप, सब्जी कुलर, शेती अभ्यास सहल,

समृद्ध परस बागेसाठी रोप झाडे, याशिवाय शेती गटासाठी एक लक्ष रुपयाचे स्वतंत्र अर्थसहाय्य देण्यात आले आहे.

 कंपनीकडून मिळालेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या अत्यंतिक आग्रहामुळे रब्बी हंगामात आम्ही पुन्हा एकदा येऊ असा शब्द कंपनी अधिकाऱ्यांनी दिला.