वी ए टापसे ह्यांची गणेश चित्रशाळा
दादरच्या टापसेंचा गणपती चालला लंडन, सिंगापूर, अमेरिकेला!!!
मुंबई/ क्रिडा प्रतिनिधी - बाळ तोरसकर
श्रावण महिना आला कि हिंदू धर्मात सणांची रेलचेल सुरु होते. वर्षभर लोक ज्याच्याकडे डोळे लावून बसतात त्या गणेशोत्सवाची लगबाग श्रावणा नंतर लगेच सुरु होते. फक्त हिंदू धर्मातच नव्हे तर इतर धर्मात सुध्दा गणेश पूजा आवर्जून केल्याचे पाहायला मिळते. लहानपणी गणपती म्हटले कि मुलांची चंगळ असायची. गणपती कुठून आणायचा? त्यासाठी आरास काय करायची? हे ठरवत सगळ्यांची लगबग सुरु व्हायची. त्यातच स्वयंपाक घरात मोदक, भाजी भाकरी, पुरण पोळी आदी मेनू करण्यासाठी जोरदार तयारी केली जात असे. अशातच गणपती येण्याची वेळ जवळ यायची. अशाच एका गणेश शाळेची ज्यांचा गणपती लंडन, सिंगापूर, अमेरिकेला जातो त्यांची माहिती आपण करून घेऊ.
दादरच्या शिवाजी पार्क मध्ये १९४८ साली वसंतराव टापसे ह्यांनी गणेश चित्रशाळा (गणेश मूर्ती तयार करण्याचा) सुरु करण्याचा चंग बांधला. त्यांनी २५ गणपती करून या गणेश चित्रशाळेचा श्री गणेशा केला. लोकांनी त्याला हळूहळू चांगला व उदंड प्रतिसाद दिला. जवळजवळ १९७२ पर्यंत त्यांनी आपली जोरदार घोडदौड चालू ठेवली. पण १९७२ साली वसंतराव टापसे यांना देवाज्ञा झाली व या गणेश चित्रशाळेच काय होणार याचा घोर लागला. पण त्यानंतर वसंतरावांच्या पत्नी चंपावती टापसे व त्यांचा भाऊ मिलिंद गजानन कविटकर यांनी हे शिवधनुष्य उचलायचे निश्चित केले.
अतिशय सुबक व रेखीव मुर्त्या तयार होत असल्याने हळूहळू या वी ए टापसे गणेश चित्रशाळेतून फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मागणी होऊ लागली. मध्यंतरी मुर्त्यांची मागणी इतकी वाढली कि त्याची संख्या ८०० पर्यंत पोहोचली. त्यात तेजस कविटकर यांनी सुद्धा पुढाकार घेत या गणेश चित्रशाळेचा डोलारा वाढवण्यात मोलाचा हातभार लावला. यासाठी मालवण, रायगड व मुंबईतील जवळजवळ २५ कामगारांचा राबता चालू असतो. या चित्रशाळेचे विशेष म्हणजे ७०% शाडू व कागदाच्या लगद्या पासून बनवलेल्या मुर्त्या असून ३०% प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्त्या तयार केल्या जातात. परंतु दादर शिवाजी पार्क सारख्या भागात असलेल्या जागेच्या अभावी आता फक्त ६०० मूर्त्याच विक्री करतात.
या चित्रशाळेत ६ इंचा पासून ६ फूटां पर्यंत मुर्त्या तयार केल्या जातात. या मुर्त्यांची कीर्ती इतकी दूरवर पसरली कि या मुर्त्या आता संपूर्ण महाराष्ट्राबरोबर गुजरात, पंजाब, लंडन, सिंगापूर, अमेरिका येथील भाविक सुध्दा आवर्जून मगणी करत आहेत व ती मागणी पूर्ण करता येत असल्याचे समाधान खूप मोठे असल्याचे तेजस आवर्जून सांगतात. या गणेश चित्रशाळेतून माजी मुख्यमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे, मा. विशाखा राऊत यांच्यासह चित्रपट सृष्टीतील शिल्पा तुळसकर, आदित्य वैद्य, अर्चना नेवरेकर यांच्यासह अनेक दिग्गज गणेश मूर्ती घेऊन जातात.