"किड्स स्पोर्ट्स कार्निवल" बोरीवलीत उत्साहात संपन्न
मुंबई/ क्रिडा प्रतिनिधी- बाळ तोरसकर
मुंबई : प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या "किड्स स्पोर्ट्स कार्निवल" या आगळ्यावेगळ्या आंतरशालेय उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा छान प्रतिसाद मिळाला. सुविद्या स्पोर्ट्स अकॅडमी गोराई, बोरीवली (पश्चिम) या ठिकाणी या कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि वीरमाता अनुराधाताई गोरे यांनी उपस्थित राहून 15 शाळांमधून साडेआठशे पालक आणि मुलं यांना 'खेळाचे महत्व' याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. अनुराधाताई गोरे आणि गोपाळ शेट्टी यांनी या वेळी आयोजकांचे, सर्व मुले, पालकांचे कौतुक करून 'खेळ आपल्याला शिस्तबद्धता आणि योग्य संयम शिकवतात' असे सांगितले. येणाऱ्या काळामध्ये मुंबई उपनगरात "स्पोर्ट्स हब" बनविण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे मत देखील गोपाळ शेट्टी यांनी सर्वांसमोर मांडले.
यावेळेस प्रज्ञावर्धिनी फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी अॅडव्होकेट सौ. रूपाली ठाकूर, ट्रस्टी सौ. वैशाली भिडे बर्वे, ट्रस्टी महादेव गोविंद रानडे, सुविद्या प्रसारक संघाचे माजी अध्यक्ष डॉ. वसंत खटाव, अथेना ग्लोबल लॉजिस्टिकसचे . विल्फ्रेड मेनेझेस, एमसीएचे क्रिकेट प्रशिक्षक नागेश ठाकूर, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे माजी सेक्रेटरी जनरल. नरेंद्र बगाडे हे मान्यवर देखील उपस्थित होते.