Unpaid Duty.........
बागलकोट प्रतिनिधी / लेखिका- सौ. सुधा बेटगेरी
अनपेड ड्युटी म्हणजे कोणतीही आर्थिक मोबदला न मिळालेली कामं, ज्यामध्ये घरगुती कामं आणि कुटुंबाची जबाबदारी समाविष्ट असते.
हे काम घरातील सर्व सदस्य, विशेषतः स्त्रिया, मोठ्या प्रमाणात करतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा या कामांमध्ये सहभाग अधिक असतो; काही अभ्यासांनुसार, तो चारपट आहे. किमान दिवसातून सहा तास तरी स्त्रीला या कामासाठी वेळ द्यावा लागतो.
स्त्रियांना घर आवरणे, स्वयंपाक करणे, पाहुण्यांचे स्वागत करणे, मुलांचा होमवर्क करण्यास मदत करणे आणि ज्येष्ठ व्यक्तींची देखरेख करणे यासारख्या अनेक जबाबदाऱ्या निभावायला लागतात. परंतु या सर्व कामांमध्ये आर्थिक मोबदला काहीच नाही. त्यामुळे ही कामे बऱ्याचदा कमी लेखली जातात. पण या सर्व जबाबदाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असतात; त्याचे श्रेय तिला मिळत नाही. काळाच्या प्रमाणे थोडा बदल म्हणजे "house wife" चे "house maker" या शब्दात झालेले आहे. परंतु परिस्थितीत काही बदल नाही. पुरुषांच्या स्वप्नांना, मुलांच्या स्वप्नांना पूर्ण करता करता स्त्रीने स्वतःच्या कितीतरी स्वप्नांना पायाखाली घातले आहे. विडंबना म्हणजे, तिच्या या अनपेड ड्युटीची जाणीव कुटुंबातील सदस्यांना नसते.
हे सर्व काम म्हणजेच तिचे अस्तित्व आणि तीच तिची ओळख बनून राहिले आहे. यामुळे स्त्री स्वतःसाठी आणि आपल्या करिअरसाठी वेळ काढण्यात असमर्थ ठरते. या परिस्थितीमुळे अनेक प्रतिभावंत स्त्रिया त्यांच्या कौशल्यांना प्रकट करू शकत नाहीत. त्यांच्यात असणारा आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. स्त्रीचा व्यक्तिगत व व्यावसायिक विकास खुंटून जातो.
वाद नाही की स्त्रियांनीच ही कामे का करावी; परंतु मुद्दा असा आहे की पुरुषांनीही या जबाबदाऱ्यांची समज करून घेतली पाहिजे. स्त्री-पुरुष समानतेसाठी, दोघांनीही घरातील कामे आणि जबाबदाऱ्या समप्रमाणात वाटून घेणे आवश्यक आहे. स्वप्नावर हक्क फक्त पुरुषांचा नाही; स्त्रियांचाही आहे. आकाशामध्ये उंच भरारी मारण्याची मनशा स्त्रियांमध्येही असते. तिच्या व्यक्तित्वाला फुलण्यासाठी योग्य वातावरण तिला मिळावे आणि तिच्यासाठी थोडा वेळ मिळावा, हे आवश्यक आहे. म्हणून घरातील पुरुषांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी. जर एखादी स्त्री घराची आणि बाहेरची दोन्ही काम सांभाळत असेल, तर पुरुष का सांभाळू शकत नाही? फक्त gender equality चे नारे लावल्याने gender equality होत नाही. त्या दृष्टीने, सर्व समाजाने जागृत होणे आवश्यक आहे आणि जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.
यामुळे स्त्रिया त्यांच्या क्षमतांचा विकास करू शकतील, आणि स्वतःचे प्राबल्य व्यक्त करू शकतील. समाजात त्यांना प्रतिष्ठित स्थान मिळवता येईल. एकत्रित काम केल्याने एक प्रगतिशील कुटुंब आणि समाज निर्माण होईल, ज्यामुळे सर्वांच्या विकासाला वाव मिळेल. घरातील समानतेच्या वातावरणामुळे मुलांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो; मुलगा असो किंवा मुलगी, सर्व समान आहेत ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. यामुळे समाजामध्ये स्त्रियांवर घडणारे अनेक गंभीर अपराध आज आपण रोखू शकतो. जर एक सदृढ समाज स्थापन करायचा असेल, तर gender equality ची कायदाबद्ध स्थापना झालीच पाहिजे.