**विजयादशमी**
बागलकोट/ प्रतिनिधी - लेखिका- सौ. सुधा बेटगेरी
चातुर्मासातील एक महत्त्वाचा
सण म्हणजे दसरा.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मुहूर्त म्हणजे दसरा.
सर्वांसाठी उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण करणारा सण म्हणजे दसरा.
दसरा हा सण विजयादशमी, दशहरा आणि दसरा या नावांनीही ओळखला जातो. या दिवशी धन, ज्ञान व भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पानं, पाटी, पुस्तके म्हणजेच सरस्वतीची पूजा, तसेच शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते.
चातुर्मासातील अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरी केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात बसविलेल्या देवी मूर्तीची आणि घटाची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते.
दसऱ्याच्या आधीचे नऊ दिवस देवीच्या शक्तीरूपाचे पूजन केले जाते, आणि दहावा दिवस हा विजय दिवस, म्हणजेच विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.
कर्नाटकातील मैसूर राज्यातील दसरा विशेष लक्षवेधी असतो. हा दिवस 'नाड हब्बा' म्हणून कर्नाटकात ओळखला जातो. चामुंडेश्वरी देवीने महिषासुराचा वध केला आणि पापाचा नाश करून सुराज्य स्थापन केले, अशी पुराणकथा आहे. त्यामुळेच या भागाचे नाव 'मैसूर' हे प्रचलित झाले आहे. पिढ्यानपिढ्या हा उत्सव राजेशाही थाटात साजरा केला जातो. यदुवीर वडियार यांनी आजही ही वैभवशाली परंपरा कायम ठेवली आहे. आज या परंपरेला जवळजवळ 414 वर्षे पूर्ण झाली आहेत.
'दसरा' हा उत्सव पश्चिम बंगालमध्येही खूप थाटात साजरा केला जातो. अत्यंत श्रद्धापूर्वक व भक्ती भावाने दुर्गादेवीची पूजा केली जाते. लोककथेप्रमाणे, दिनाजपुर आणि मालदा जमीनदारांनी बंगालमध्ये प्रथम दुर्गा पूजनाची सुरुवात केली होती. व पुढे तीच परंपरा आजही कायम आहे.
अशीही मान्यता आहे की, पांडवांनी अज्ञात वास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटच्या गाई पळवणाऱ्या गौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला होता, त्यामुळे या शमीच्या पानांना मोठे महत्त्व आहे. दसऱ्याच्या दिवशी या आपट्यांच्या पानांची पूजा केली जाते आणि ही पाने, सोने म्हणून इष्टजनांना व आप्तमित्रांना वाटण्याची प्रथा आहे. ही पाने नुसती अदानप्रदान करू नयेत, तर वास्तूतही ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. आपट्यांची ही पाने तेजस्वरूपी असतात, त्यामुळे वातावरण शुद्धीकरणासही मदत होते.
विजयादशमीच्या दिवशीच श्रीरामांनी रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला होता. या अभूतपूर्व विजयामुळेच हा सण विजयादशमी म्हणून ओळखला जातो. यामुळे काही प्रांतांमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या मूर्तीचे दहन करण्याची प्रथा आहे.
परंतु विडंबना म्हणजे आज कोणी राम नाही, आणि रावण असलेले आपणच, रावणाच्या मूर्तीचे दहन करत आहोत.
रावण ही एक दुष्ट प्रवृत्ती आहे, जी समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या रूपांनी वावरत आहे—काम, क्रोध, लोभ, मोह मत्सर अशा रूपाने, पृथ्वीवर तिचा वास आहे. रामायणातील रावणही विद्वान होता; परंतु अहंकार व मोहाला बळी जाऊन त्याने सीतामाताचे अपहरण केले होते. परंतु त्यांनी आपली सीमा ओलांडली नाही आणि सीतामातेच्या पावित्र्याला किंचितही धक्का पोहोचवला नाही. आजच्या या कलियुगात रामा सारखे मर्यादा पुरुषोत्तम तर सोडा, रावणासारखे गुण दिसणे ही दुर्लभ आहे.
फक्त रावणाची मूर्ती दहन केल्याने कोणी राम बनत नाही. त्यासाठी साधना हवी. आपल्यातील रावणी शक्तीला पराभूत करून, आपणच स्वतःवर विजय मिळवण्याचा एक अनोखा संकल्प केला पाहिजे. आपल्या प्रत्येकात असलेला रावण जर नष्ट झाला, तर तोच दिवस खरा विजय दिवस, म्हणजेच 'विजयादशमी' म्हणून बनेल.
विजयादशमीच्या दिवशी घरोघरी तोरण फुलांच्या माळा व दारी रंगबिरंगी सजलेल्या रांगोळीचे सुशोभित दृश्य दिसते.या संदर्भात चार ओळी आठवतात,
** क्षितिजावरूनी येणाऱ्या
सूर्याला वाऱ्याने दिला मुजरा....
रम्य पहाटेला दिला सोनेरी
किरणांनी पहारा...
जिथे तिथे दरवळत आहे
तोरण फुलांचा गजरा....
आवरा आता तरी दुःखाचा पसारा... करू हर्ष उल्हासाने साजरा, विजयोत्सवाचा हा
अलौकिक दसरा....
घरोघरी रंगलेल्या रांगोळीवर साऱ्यांच्या भिरभिरत्या नजरा,
करी सुख समृद्धीचा इशारा,
दुःख कष्टाना आता तरी विसरा,
करा चेहरा थोडा तरी हसरा
करू हर्ष उल्हासाने साजरा
विजयोत्सवाचा हा लौकिक दसरा......**