खो-खो प्रेमी सरस्वती मंदिर मध्ये दसरा संमेलन संपन्न
मुंबई /क्रिडा प्रतिनिधी - बाळ तोरसकर
मुंबई- माहीम मध्ये खो-खो म्हटल कि सरस्वती मंदिर हायस्कूलच नाव लगेच झळाळून समोर येत. या शाळेने खो-खो ला जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू दिले. त्यात रंजन कोळी, दिनेश परब, बाळकृष्ण जाधव, प्रवीण सिंदकर, प्रदीप सिंदकर, अमोल राऊळ, सुनील जगताप, महेंद्र सावंत, विलास भुजबळ, विकास भुजबळ, वैशाली भुजबळ, प्रीतेश म्हात्रे, सुधीर म्हस्के, मंदार म्हात्रे, अजित यादव,शलाका म्हस्के, रेश्मा कारेकर, समाधान गांगरकर, श्रेयस राऊळ, कुशल शिंदे, श्रीकांत वल्लाकाठी, संदेश वाघमारे, निखील कांबळे, चैतन्य धुळप, सेजल यादव आदी खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत सरस्वती मंदिर हायस्कूलच नाव देशपातळीवर पोहचवल.
यात प्रवीण सिंदकर यांनी खो-खो तील एकलव्य हा सर्वोच्च पुरस्कार मिळवला होता. तर मंदार म्हात्रे, सुधीर म्हस्के यांना महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता. तुषार सुर्वे हे महाराष्ट्र खो-खो असो.चे खजिनदार होते तर सुधाकर राऊळ यांनी राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून अनेक राष्ट्रीय विजेतेपद महाराष्ट्राला मिळवून दिली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई शालेय स्पर्धेत १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील मुलांचे विजेतेपद सरस्वती मंदिरने पटकावले.
अशा या शाळेची सुरवात मुंबई येथे १९५० साली सरस्वती मंदिर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून झाली. सरस्वती मंदिर मध्ये दरवर्षी घटस्थापने पासून दसऱ्यापर्यंत अतिशय उत्साहाने व आनंदाने शारदोत्सव साजरा केला जातो. शाळेत दरवर्षी प्रमाणे या वर्षीही १२ ऑक्टोबरला दसरा संमेलन आयोजित करण्यात आले होते. दसरा संमेलनाची सुरुवात देवीची आराधना करून करण्यात आली. त्यानंतर दरवर्षी प्रमाणेच इंग्रजी, मराठी, एसएमईएस या तिन्ही विभागाच्या 'शारदा' हस्तलिखिताचे अनावरण, बक्षीस समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले होते. दसऱ्याचे औचित्य साधून शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दसरा संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती मंदिरचे माजी विद्यार्थी ज्यांनी इस्त्रोच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अॅंड टेक्नॉलॉजि, त्रिवेंद्रम येथे उच्च शिक्षण घेतलं आणि आता स्कायरूट अरोस्पेस मध्ये संशोधक म्हणून कार्यरत असलेले मा. चिन्मय शिरोडकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष कोटणीस सरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या संमेलनाचे आकर्षण होते ते म्हणजे शाळेची स्थापना झाल्यानंतर १९६१ साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेली शाळेची पहिली बॅच. या समारंभात सुरवातीपासून ते २०२४ पर्यंत शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा. उपस्थित सर्व टॉपर्स विद्यार्थ्यांना सन्मानित करण्याचा हा कार्यक्रम माजी विद्यार्थी, शिक्षक यांना गत आठवणींना उजाळा देणारा ठरला.
प्रमुख पाहुणे सन्माननीय श्रीयुत चिन्मय शिरोडकर यांनी आपल्या मनोगतात मराठीला, मायबोलीला लाभलेल्या अभिजात दर्जाचा उल्लेख केला. तसेच शिवाजी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन केले. आपल्या यशासाठी सरस्वती देवी, शाळा, शिक्षक, पालक यांचे आभार मानले. ज्ञान अनुभवातून मिळतं हे सांगताना त्यांनी इस्रो पर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. आपलं अस्तित्व देवी सरस्वती पासून ते देवी सरस्वती पर्यंतच आहे हे नमूद केले आणि स्वप्न बघा, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा, स्वप्नांचा पाठलाग करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
यानंतर संमेलनाचे अध्यक्ष श्रीयुत कोटणीस सरांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना वैज्ञानिक दृष्टीकोनाची जोपासना करा असा संदेश दिला. उपस्थितांचे आभार मानून सरस्वती स्तवनाने अभूतपूर्व अशा या दसरा संमेलनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.